सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुल व इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्च (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (दि.२५) व २६ एप्रिल रोजी ‘माध्यमे व समाज’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटक रायपूरच्या कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता विद्यापीठाचे कुलगुरू सच्चिदानंद जोशी आहेत.
सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक शास्त्रे संकुलाचे अधिष्ठाता डॉ. विलास निंबाळकर यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तर, समारोपाच्यावेळी जयपूरच्या राजस्थान विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे संचालक प्रा. संजीव भानावत हे उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती विद्यापीठातील सामाजिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. ई. एन. अशोककुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनतेसमोरील विविध प्रश्न सोडविण्यात माध्यमांची भूमिका काय असते व काय असावी, यावर या चर्चासत्रात विचारमंथन होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुधीर गव्हाणे (औरंगाबाद), शिवाजी विद्यापीठातील सोशल एक्सक्लुजन विभागाचे प्रमुख तथा नॅकचे सल्लागार प्रा. रमेश दांडगे, पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या युथ कम्युनिकेटर्स क्लबचे अध्यक्ष प्रणव पनी (बंगलोर), फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य डॉ. दुर्गेश त्रिपाठी (नवी दिल्ली), डॉ. चंद्रशेखर व डॉ.मंजुनाथ (बंगलोर), महाराष्ट्राच्या वन विभागाचे माजी संचालक डॉ. व्ही. के. मोहन, डॉ. उमाशंकर पांडे (कोलकाता), मुंबईच्या एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या डॉ. मीरा देसाई, मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ.मंगेश करंदीकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर, मौलाना आझाद विद्यापीठातील पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. मोहम्मद फरियाद व डॉ. एहतेशाम खान (हैदराबाद) आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे. याशिवाय नांदेडच्या स्वामी रामानंद विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप शिंदे, डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या संशोधन नियतकालिकेचे संपादक डॉ. सचिन भारती (नवी दिल्ली)शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. निशा पवार, नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. धर्मेश धावनकर, डॉ. रश्मी सिंग (कर्नाल, हरियाना), कर्नाटक महिला विद्यापीठातील पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. ओंकार काकडे (विजापूर), सिंहगड इन्स्टिटय़ूटच्या व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. राजशेखर येळीकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, प्रा. धनराज पाटील (सोलापूर) यांचाही मार्गदर्शकांमध्ये समावेश आहे. या चर्चासत्रात देशभरातून शंभरपेक्षा अधिक संशोधक, प्राध्यापक, पत्रकार सहभागी होणार असल्याचे डॉ. अशोककुमार यांनी सांगितले. या चर्चासत्रात ग्रामीण विकास, अर्थशास्त्र, पर्यटन, पुरातत्त्वशास्त्र तसेच सामाजिक शास्त्रातील विविध विषयांचे संशोधक ६० शोधनिबंध सादर करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.