राजकीय दबावामुळे शिक्षकांच्या बदल्या रोखल्याने ठाणे जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून बिगर आदिवासी विभागातील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षकांविनाच सहामाही परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. बदल्यांच्या घोळामुळे आदिवासी विभागातील शिक्षण व्यवस्थेचा घोळ निस्तरण्यासाठी आदिवासी विभागात कैक वर्षे सेवा बजाविलेल्या शहापूर तालुक्यातील शिक्षकांनाच दुर्गम भागात पाठविण्याच्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या निर्णयाबद्दल शिक्षकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला.
आदिवासी विभागातील शिक्षकांची शेकडो पदे रिक्त राहिल्याने जिल्ह्य़ातील तळागाळातील हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्टय़ाबोळ उडाला आहे. बिगर आदिवासी विभागातील शिक्षकांच्या बदल्या रोखताना आदिवासी विभागात शिक्षकांची पर्यायी व्यवस्था करण्याचे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत ठरले होते. मात्र तसा कोणताही प्रयत्न शासनस्तरावर न झाल्याने पुन्हा एकदा बदल्यांचे कागदी घोडे नाचवून समायोजन साधल्याचा देखावा जिल्हा प्रशासनास करावा लागला. शनिवारी अनुशेष भरण्यासाठी घाईघाईने बदल्या करण्यात आल्या, मात्र त्याबाबत शिक्षकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली.
ठाणे जिल्ह्य़ातील १३ तालुक्यांमध्ये एकूण ३ हजार ६६२ शाळा असून त्यात एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्य़ातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू आणि शहापूर हे तालुके आदिवासी विभागात तर अन्य तालुके बिगर आदिवासी गटात मोडतात. आदिवासी विभागात मोठय़ा प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असून न्यायालयाच्या आदेशानुसार ती भरण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला मे महिन्यात बिगर आदिवासी विभागातून ४३२ शिक्षकांच्या बदल्या आदिवासी विभागात करण्यात आल्या. मात्र बदली झालेल्या शिक्षकांनी त्यास विरोध केला. राजकीय नेत्यांनीही तोंडी आदेश देऊन या बदल्या रोखल्या. मात्र त्यामुळे आदिवासी विभागातील शिक्षकांचा अनुशेष कायम राहिला आहे. परिणामी सहा तालुक्यांतील हजारो विद्यार्थ्यांनी यंदा शिक्षकांविनाच सहामाही परीक्षा दिल्या. उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्य़ात पदवीधर शिक्षकांच्या एकूण ३६६ जागा रिक्त असून त्यातील तब्बल ३०० पदे आदिवासी विभागातील आहेत. मुख्याध्यापकांची एकूण १९९ पदे रिक्त असून त्यापैकी १३० पदे आदिवासी विभागातील आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी विभागात केंद्रप्रमुखांची ४९ पदे रिक्त आहेत.