अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविणाऱ्या ४३ उमेदवारांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा पक्षाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘झाले गेले विसरून जा आणि कामाला लागा’ असा संदेश शिंदे यांनी बंडखोर उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे यांना दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यात समरस होणाऱ्या शिवसैनिकांची एक बैठक नुकतीच कोपरी येथील एका बंडखोराच्या कार्यालयात झाली.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पालिका निवडणुकीत नवी मुंबईतील अनेक शिवसैनिकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास निसटला. पालिका निवडणुकीत आयारामांना लाल गालिचा अंथरण्यात आल्याने निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरी केली. पालिका सत्तासोपानासाठी लागणाऱ्या जादुई आकडय़ातील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले दोन नगरसेवक हे शिवसेनेचे बंडखोर आहेत. त्यामुळे पालिकेत सत्ता स्थापन करण्याची सुर्वणसंधी आलेली असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि सनदी अधिकारी पदाचा काळ संपल्यानंतर निवृत्ती काळात व्यस्त राहण्यासाठी शिवसेनेची कास धरलेले पालिकेचे माजी आयुक्त व शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी उमेदवारीचे चुकीचे वाटप केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पाचव्यांदा पालिकेत सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमित्ताने देशभर परिवर्तनाचे वारे वाहत असताना नवी मुंबईत होणारे परिवर्तन शिवसेनेच्या अतिआत्मविश्वासामुळे थांबले आहे. ३८ नगरसेवकांच्या साह्य़ाने विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर सैनिकांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे. त्यात राज्यात शिवसेना-भाजप युतीमध्ये विस्तव जात नसल्याने शिवसेना भक्कम करण्यावर भर दिला जात आहे.
निवडणूक काळात ठाण्याच्या महापौर बंगल्यावर शिंदे यांच्याबरोबर कडाक्याचे भांडण करणाऱ्या हरिभाऊ म्हात्रे यांनाच शिंदे यांनी पुन्हा गळाला लावले असून झाले गेले विसरून कामाला लागण्यास सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या घरवापसी आमंत्रणाचे स्वागत करून बंडखोराची एक बैठक नुकतीच कोपरी येथील बंडखोर योगेश हेळकर यांच्या कार्यालयात झाल्याचे समजते. त्या वेळी शिवसेनेचे कार्य पुन्हा सुरू करू इच्छिणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले, तर शिवसेनेला रामराम करणाऱ्यांना दरवाजे मोकळे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ‘सुबह का भूला श्याम को घर वापस आये तो उसे भूला नही कहते’ अशी भावना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चौगुले-मढवी वाद विकोपाला
पालकमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे ऐरोलीतील शाखेवरून माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले व नगरसेवक एम. के. मढवी यांच्यात चांगलेच शीतयुद्ध सुरू झाले आहे. या भांडणाचा एक अंक शिंदे यांच्यासमोर पार पडला आहे. यावरून शिंदे -चौगुले वादही झाला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेत खळबळ माजणार असे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, ऐरोली सेक्टर -८ मधील ती जागा निवडणूक काळासाठी आम्ही भाडय़ाने घेतली होती आणि तसा करारनामा आपल्याकडे असल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले आहे. विकासकाने मूळ शिवसेना शाखेच्या बदल्यात मागील बाजूस एक गाळा दिलेला आहे. तो भाडय़ाने देण्यात आला असून मोक्याचा गाळा निवडणुकीसाठी भाडय़ाने घेतल्याचा खुलासा चौगुले यांनी केला आहे. शिंदे-चौगुले जुगलबंदीच्या वृत्तामुळे शिवसेनेची बदनामी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.