कोल्हापूर जिल्हय़ात लाळखुरकत साथीमुळे जनावरांचा मृत्यू होऊ लागला आहे. त्यावर उपाययोजनाकरण्यात पशुसंवर्धन विभाग निष्क्रिय ठरल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला. पशुसंवर्धन विभागाचे वैद्यकीय अधिकारी कांबळे यांनी ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरण मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले.     
जिल्हय़ाच्या ग्रामीण भागामध्ये पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक हातभार लागत असतो. तथापि गेल्या काही महिन्यांत लाळखुरकत साथ मोठय़ा प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तर पशुसंवर्धन विभाग याबाबतची उपाययोजना करण्यात अपयशी ठरला आहे. या विभागातील बहुतांशी पदे रिक्त असल्याने जनावरांना वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध होत नाही. या समस्या घेऊन शिवसेनेने आज जिल्हा परिषदेवर जनावरांसह मोर्चा काढला.
गायी, म्हशी सोबत घेऊन जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, हर्षल पाटील, सरदार टिप्पे, धनाजी यादव, अभिषेक देवणे, चंद्रकांत भोसले, शहाजी भोपळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पशुसंवर्धन विभागाचे वैद्यकीय अधिकारी कांबळे यांना दिलेल्या निवेदनात रिक्त पदे भरावीत, प्रत्येक गावात लसीकरण शिबिर घ्यावे, प्रत्येक केंद्रावर औषधे द्यावीत आदी मागण्या करण्यात आल्या.