लातुरातील नाटय़सृष्टीचे अध्वर्यू ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. रवींद्र गोवंडे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी सावेवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
१९५५च्या सुमारास प्रा. गोवंडे हे स्थापत्य शाखेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लातुरात आले. सुरुवातीला एस. टी. महामंडळात अभियंता म्हणून काही काळ नोकरी केली. त्यानंतर पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमध्ये अध्यापन कार्य सुरू केले. त्यांनी हजारो उत्तम अभियंते घडवले. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन सुरू ठेवले. लातूरच्या रसबहार व कलोपासक या सांस्कृतिक मंडळांच्या उभारणीत, ऊर्जतिावस्था आणण्यास त्यांनी मोठे योगदान दिले. उत्कृष्ट बांधकाम सल्लागार म्हणूनही त्यांचा लौकिक होता. शहरातील ज्या जुन्या, मजबूत इमारती आजही दिमाखात उभ्या आहेत, त्या प्रा. गोवंडे यांच्या देखभालीचे द्योतक आहेत.
गोवंडे सरांनी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘रंगमंच’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत शाळकरी मुलांसाठी १५ दिवसांची सुमारे १९ व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे घेतली. यात त्यांची पत्नी दिवंगत माधवी यांचाही मोलाचा वाटा होता. मुलांना सहजतेने वावरू दिले पाहिजे. त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावभावनांना व्यक्त करण्यास वाव दिला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.
प्रा. गोवंडे यांच्या निधनाबद्दल लातूरच्या नाटय़क्षेत्रातील अनेकांनी दु:ख व्यक्त केले. लातूरच्या रंगमंचावरील नटसम्राटाचा अस्त अशी भावना संजय अयाचित यांनी व्यक्त केली. ज्यांचे बोट धरून रंगमंचावर पदार्पण केले त्यांच्या जाण्यामुळे पोरके झाल्याची खंत बाळकृष्ण धायगुडे यांनी व्यक्त केली. खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, आमदार दिलीपराव देशमुख व अमित देशमुख यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले.
आवाजाचे उपजत देणं
‘पुन्हा पुन्हा मोहोंजदरो’, ‘निष्पर्ण वृक्षावर भरदुपारी’, ‘नटसम्राट’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’ अशी अनेक नाटके गोवंडे यांनी गाजवली. नाटकातील आवाजाची त्यांना उपजत जाण होती. आवाजात जरब असली तरी त्यांनी खेळीमेळीचे वातावरण टिकेल या साठी सतत प्रयत्न केले. त्यांच्यासोबत ‘गुडबाय डॉक्टर’ व ‘शांतता कोर्ट चालू आहे’, या नाटकांत काम करणाऱ्या अॅड. स्मिता परचुरे यांनी गोवंडे सरांना अभिनयात मिळालेल्या अनेक बक्षिसांची आठवण जागवली. ‘संध्या-छाया’ नाटकात भूमिका वठवण्याची त्यांची इच्छा मात्र तशीच राहून गेली असल्याचे त्या म्हणाल्या.