आ. बबनराव पाचपुते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी राजीव राजळे यांना योग्य राहील व त्यांचीच उमेदवारी जाहीर होईल, असे आपल्याला वाटते, असे सांगतानाच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी राजळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘लो प्रोफाइल’ वागणे आवश्यक आहे, असा सल्लाही दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गडाख यांनी ते स्वत: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. नगर दक्षिण मतदारसंघात पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातील सर्वानीच मनापासून काम करणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. आपला तालुका उत्तरेत आहे, परंतु दक्षिणेतील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ लोकांकडे ही जबाबदारी पक्षश्रेष्ठी देतील असे आपल्याला वाटते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
पालकमंत्री मधुकर पिचड प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी दक्षिणेत तुमच्याशिवाय उमेदवार नाही, लोकसभा निवडणुकीसाठी तयार रहा, त्यासाठी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घ्या, असे सांगितले होते. पवार यांची भेट घेतली असता, आपण त्यांना सांगितले, की माझा तालुका उत्तरेत आहे व माझी त्यासाठी तयारी नाही. पवार यांनी, तुमच्याबाबत तालुक्याचा प्रश्न नाही, हे मी तिन्ही लोकसभा निवडणुकीत बघितले आहे, असेही स्पष्ट केले होते. त्यानंतर मुंबईत पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री पिचड, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत तीन-चार वेळेस चर्चा झाली व मी लोसभेसाठी इच्छुक नसल्याचे त्यांना सांगितले आहे, असेही गडाख यांनी नमूद केले.
आ. पाचपुते यांनी दुष्काळात चांगले काम केले. परंतु ते स्वत: इच्छुक नाहीत, त्यामुळे राजळे यांना उमेदवारी योग्य राहील असे मला वाटते व त्यांचीच उमेदवारी जाहीर होईल, असेही वाटते, परंतु विधानसभा व लोकसभा निवडणुकीत खूप फरक आहे. सध्याची निवडणूक सोपी आहे, असे कोणी समजू नये राजळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लो प्रोफाइल राहणे आवश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
आपल्या तिन्ही लोकसभा निवडणुकीत पक्षातील व वेगवेगळय़ा क्षेत्रांतील जे समोर येत नाहीत अशा विविध जातिधर्मातील लोकांनी खूप मदत केली, या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसने मनापासून काम केले तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय दूर नाही, असे मला वाटते. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यास आपण घाबरलो नाही, परंतु राजकारणात कोठे थांबायचे हे मला चांगले माहीत आहे, त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला, असेही गडाख यांनी स्पष्ट केले.