ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक, संघटक मेजर महादेव वासुदेव तथा दिनुभाऊ कुलकर्णी यांचे आज पहाटे राहत्या घरी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाममधील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. अंत्यविधीस क्रीडासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
त्यांच्यामागे पत्नी शोभाताई व चिरंजीव, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, सून, नातवंडे असा परिवार आहे. फुलांनी सजवलेल्या वाहनातून दिनुभाऊंचे पार्थिव शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन अमरधाममध्ये नेण्यात आले. स्नेहालयचे शहरातील कार्यालय, तसेच श्रीसमर्थ विद्या प्रसारकच्या सांगळे गल्लीतील शाळेत पार्थिव काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
दिनुभाऊंनी हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा कॉलेजमध्ये क्रीडा विभागाचे प्रमुख म्हणून दीर्घकाळ काम पाहताना अनेक खेळाडू घडवले. राज्य क्रीडा परिषदेचे ते १० वर्षे सदस्य होते. अनेक क्रीडा निवड समित्यांवर त्यांनी काम पाहिले. मल्लखांब, खो-खो संघटना स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. या खेळांप्रमाणेच कबड्डी, बास्केटबॉल, जिमनॅस्टिक खेळांचे प्रशिक्षक, संघटक म्हणून त्यांनी काम पाहिले. अ‍ॅथलेटिक, ज्युदो संघटनेचे ते सल्लागार होते. अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धाच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. क्रीडाप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व अ‍ॅकॅडमी ऑफ फिजिकल एज्युकेशन संस्थांच्या स्थापनेत व त्या नावारुपाला आणण्यात त्यांचा पुढाकार होता. मंडळाचे ते विद्यमान उपाध्यक्ष होत. दिनुभाऊंनी राष्ट्रीय छात्रसेनेचे मेजर पदही भूषवले. एनसीसीच्या अनेक शिबिरांचे व्यवस्थापनही त्यांनी केले.
अंत्यविधीप्रसंगी खासदार दिलीप गांधी, आ. अनिल राठोड, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. मधुसूदन मुळे यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.