तुकूम परिसरातील आझाद हिंद चौकातील एका नाल्याच्या काठावर अवघ्या आठ महिन्याच्या जुळय़ा मुलांची मृत अर्भके मिळाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात लोकांविरुध्द रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या परिसरातील तीन प्रमुख प्रसुतीगृहात सुरू असलेल्या अवैध गर्भपातातून या घटना समोर येत असल्याने कारवाईची मागणी शिवसेना व मनसेने लावून धरली आहे. दरम्यान, तुकूम येथे अर्भक मिळाल्याची ही चौथी घटना आहे.
तुकूम येथे जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या अगदी मागे आझाद हिंद चौक आहे. या चौकातील मुख्य नाल्यात आज सकाळी मोहम्मद अजीज शेख यांना दोन मुलांची मृत अर्भके दिसली. त्यांनी या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली. प्राप्त माहितीच्या आधारावर रामनगर पोलिसांनी घटनास्थळी येऊन बघितले असता अवघ्या आठ महिन्याची दोन अर्भके नाल्याच्या अगदी काठावर मृतावस्थेत पडून होती. रक्ताने माखलेली हे दोन्ही अर्भके नुकतीच प्रसुती झाल्यानंतर नाल्यात आणून टाकले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच आधारावर रामनगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे.
 ही मृत अर्भके मिळाले तेथून अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर एक प्रसुतीगृह आहे. या प्रसुतीगृहात अधिकृत गर्भपात केंद्र सुध्दा आहे. त्यामुळे अवैध गर्भपात केल्यानंतर या दोन्ही अर्भकांना तिथेच नाल्याच्या काठावर फेकून दिले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. तिकडे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे. त्याला कारण गेल्या दीड ते दोन वर्षांतील ही चौथी घटना आहे. यापूर्वी सुध्दा अशाच पध्दतीने नाल्यात किंवा कचरा कुंडीत अर्भक मिळाले होते. तेव्हा सुध्दा पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल करून प्रकरण चौकशीत ठेवले होते. आतासुध्दा रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी पोलिस उपनिरीक्षक एन.बी.किन्नाके करीत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना व मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे. तुकूम परिसरात तीन मोठे व अन्य छोटे प्रसूती केंद्र आहेत. या प्रसुती केंद्रातून मोठय़ा प्रमाणात अवैध गर्भपात होत असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु पोलिस चौकशी करीत नसल्याने अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांना मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे या तिन्ही प्रसुतीगृहाची प्रत्यक्ष भेट देवून चौकशी करावी, अशीही मागणी मनसे व शिवसेने केली आहे. अवैध गर्भपाताच्या व्यवहारात जो डॉक्टर सक्रिय असेल त्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी पोलिसांनी या परिसरातील सर्व प्रसुतीगृहाची पाहणी केल्यानंतर जिथे अवैध गर्भपात होत असल्याचे निदर्शनास येत असले तिथे कारवाई करावी अशी मगणी सर्वसामन्यांनी केली आहे. अवैध गर्भपाताच्या घटना समोर येत असतांना डॉक्टरांची संघटना असलेली आयएमए शांत बसली आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार शिवसैनिक आयएमए व जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सुध्दा करणार असल्याची माहिती आहे. डॉक्टरच अवैध गर्भपातात सक्रिय असल्याच्या घटना समोर येत असल्याने चिंता वाढली आहे.

अवैध गर्भपातासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना डॉक्टर अटकेत
गर्भपात करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. नितीन उईके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर येथील पथकाने मुद्देमालासह अटक केल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. चिमूर येथील रहिवासी असलेले किशोर गुरनुले यांना मूल नको असल्याने त्यांनी पत्नीचा गर्भपात करण्यासाठी डॉ. नितीन उईके यांच्याशी संपर्क साधला. दोन महिन्याच गर्भ असल्याने व शासकीय नियमानुसार ३ महिन्यानंतर गर्भपात करावा लागत असतानाही डॉ. उईके यांनी या कामासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. लाच देण्याची तयारी नसलेल्या गुरनुले यांनी थेट नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर पोलिस निरीक्षक अशोक साखरकर यांनी सापळा रचला व बुधवारी उईके यांना लाच स्वीकारताना मुद्देमालासह अटक केली. अवैध गर्भपात करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला अटक करण्याची ही पहिलीच घटना आहे.