जीवनावश्यक वस्तू गोळा करून गरजूंपर्यंत पोहोचविणार

घरात अडगळीत ठेवण्यात आलेल्या वस्तू किंवा लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असलेल्या सर्व वयाच्या व्यक्तीचे कपडे, मुलांचे शैक्षणिक साहित्य, गणवेश, भांडी, स्वेटर्स आदी जीवनावश्यक वस्तू चांगल्या परिस्थितीत असताना आपण केवळ त्या जुन्या झाल्या म्हणून वापरत नाही, त्यामुळे अशा वस्तू रोटरी क्लब ऑफ एलिट ही संस्था जमा करून समाजातील गरजू आणि गरिबांपर्यंत पोहोचविणार आहे.
प्रत्येकाच्या घरी बऱ्याच वस्तू अतिरिक्त असतात किंवा जुन्या झाल्या म्हणून फेकायचा किंवा कोणाला देण्याची  मानसिकता नसल्यामुळे त्या आपण संग्रहीत ठेवत असतो. काही दिवसांनी अडगळीचे सामान म्हणून त्या फेकून देत असतो किंवा लोहा लोखंडवाल्याला देत असतो. मात्र अशा वस्तू संवेदना या उपक्रमातंर्गत आता रोटरी क्लब ऑफ एलिटचे कार्यकर्ते जमा करणार आहे. १० मे रोजी सकाळी १० वाजता माटे चौकात जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रोटरीचे प्रांत क्रमांक ३०३० ते डिस्ट्रीक्ट गव्‍‌र्हनर दादा देशमुख यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत ढेंगळे राहतील.
ज्या व्यक्तींना आपल्याकडे असलेले असे अतिरिक्त साहित्य गरजू लोकांपर्यंत पोहोचावे असे वाटत असेल त्यांनी रोटरी क्लब एलिटच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा किंवा १० मे रोजी माटे चौकात उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी अंजली पाठक ९९२२४१५१३३, अमोल वटक ९८५९३८५९०२, डॉ. वंदना टोपे ९८२३०१८२९७, प्रसाद फडणवीस ९८६०१५९००२, निशांत बिर्ला ९३७३२८९४३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटचे अध्यक्ष अविनाश पाठक यांनी केले आहे.