येथील तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस विद्यालयातील खेळाडूंची निवड छत्तीसगडमधील दुर्ग येथे २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या १७ वर्षांआतील गटाच्या शालेय राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेसाठी झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये अनिमेश भावसार, शंतनु पाटील, संकेत परदेशी, तन्मय कर्णिक, स्वामिनी शेटे, अरुंधती काकडे, इशा कुलकर्णी, वैष्णवी शिंदे, सोनाली वाघ, देवयानी येवले, रेणुका शुक्ला यांचा समावेश आहे. या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक विक्रम दुधारे, सुरेखा पाटील, स्वप्निल कर्पे आदींचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर व पुणे शालेय टेनिक्वाइट स्पर्धेत विजेते
कोल्हापूरच्या मुलांनी आणि पुण्याच्या मुलींनी येथील विभागीय क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा परिषद व नाशिक जिल्हा टेनिक्वाइट संघटना यांच्या वतीने आयोजित शालेय राज्यस्तरीय टेनिक्वाइट स्पर्धेत सांघिक गटात विजेतेपद मिळविले.
स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश नांदूरकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, विभागीय क्रीडा उपसंचालक जगन्नाथ आधाने, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश टिळे यांनी केले. आभार जिल्हा संघटनेचे सचिव संजय होळकर यांनी मानले.
पहिल्या दिवशी झालेल्या सांघिक गटात मुलांमध्ये प्रथम कोल्हापूर विभाग, द्वितीय अमरावती, तृतीय पुणे विभाग यांनी यश मिळविले. मुलींमध्ये प्रथम पुणे, द्वितीय नागपूर, तृतीय अमरावती, चतुर्थ नाशिक या संघांनी विजय मिळविले.
या स्पर्धेतील कामगिरीनुसार छत्तीसगडमधील दुर्ग येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे.