भावनिक बंध निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे, असे मत निवृत्त प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या एकसष्टीनिमित्त एसएमआर स्विमिंग पूल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. अशोक कुकडे, ज्योती महाजन, कमलाबाई महाजन उपस्थित होते. देशपांडे म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांपासून अनिल महाजन यांची आपली मैत्री आहे. अभाविपचे काम हा मैत्रीचा धागा. पुढे जिव्हाळा वाढत गेला. आपल्याला जी मिळालेली नैसर्गिक संपदा आहे, त्यावर आपली एकटय़ाची मालकी नाही तर साऱ्या समाजाची आहे, असा विचार रा. स्व. संघाच्या कामात मनावर कोरला गेला. त्यामुळे आपल्याकडे जे आहे ते आपले एकटय़ाचे नाही, त्यावर समाजाचा हक्क आहे या जाणिवेतूनच काम होत राहिले. संघटन उभे राहण्यासाठी तत्त्वज्ञानाची गरज असते. मात्र, त्यासाठी कार्यकर्ते एकत्रित येण्यास भावनेचा ओलावा देणाऱ्या माणसांची गरज असते. ती गरज अनिल महाजन यांनी आयुष्यभर काम केले.  
संघाचे ज्येष्ठ प्रचारक संभाजीराव भिडे यांच्या मार्गदर्शनामुळे आपण इतकीवर्षे सामाजिक कामात राहिलो, असे महाजन म्हणाले. या वेळी डॉ. अशोक कुकडे, गुरुनाथ मगे, प्रमोद कुलकर्णी, किरण भावठाणकर, बाळकृष्ण धायगुडे, प्रा. सतीश पत्की, शेषाद्री डांगे आदींनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक सुनील देशपांडे यांनी केले. प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी सूत्रसंचालन केले.    
निरलस भावनेने काम
स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये नोकरी करताना अभाविप, रा. स्व. संघ, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था यात कार्य करीत महाजन यांनी लातूरच्या नाटय़चळवळीतही योगदान दिले. सुटीच्या दिवशीही सामाजिक कामात सातत्याने वेळ देत कार्यकर्ते घडवले.