तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र विश्रांतिगृहांची सोय उपलब्ध करून देण्याची सूचना मुंबई विद्यापीठाने आपल्या संलग्नित महाविद्यालयांना केली आहे.
‘ट्रान्सजेंडर्स इन नॅशनल लीगल सव्र्हिसेस अॅथॉरिटी’ विरुद्ध केंद्र सरकार या निकालात सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांचे व्यक्ती म्हणून असेलेले अधिकार मान्य करत समाजात मानाने जगात यावे यासाठी राज्यघटनेतील विविध कलमांचा आधार घेऊन काही निर्देश दिले होते. त्या आधारे विद्यापीठ अनुदान आयोगाने या विद्यार्थ्यांकरिता काही सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना देशभरातील विद्यापीठांना केली होती. त्यानुसार या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश किंवा कुठल्याही प्रकारच्या अर्जामध्ये ‘लिंग’ स्पष्टीकरण विषयीच्या स्त्री आणि पुरुष या रकान्याबरोबरच ‘ट्रान्सजेंडर’ असा स्वतंत्र रकाना उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केली होती.
आता या विद्यार्थ्यांना स्वतंत्र विश्रांतिगृह उपलब्ध करून देण्याची सूचना करून विद्यापीठाने आणखी एक पाऊल टाकले आहे. इतकेच नव्हे तर या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाकरिता आणि त्यांच्या विषयीच्या इतर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या चुकीच्या कल्पना दूर करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयांनी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचनाही विद्यापीठाने १८ एप्रिल रोजी महाविद्यालये आणि संबंधित संस्थांकरिता काढलेल्या एका परिपत्रकात केली आहे. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा इतर विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन निकोप असावा आणि त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे वातावरण अधिक उदारमतवादी व्हावे या हेतूने या सूचना विद्यापीठाच्या ‘विद्यार्थी कल्याण विभागा’मार्फत करण्यात आल्या आहेत.
याचबरोबरच ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्याचे निर्देश विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करणाऱ्या समितीलाही देण्यात आले आहेत. किमान २४ तासांच्या आत या विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात यावी, असे विभागाचे संचालक मृदुल निळे यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्थात विद्यापीठाने पाठविलेल्या या परिपत्रकाने काही महाविद्यालयांची अडचण केली आहे. कारण, काही महाविद्यालयांकडे मुळातच जागेचा तुटवडा आहे. त्यात तृतीयपंथी विद्यार्थ्यांना स्वतंत्र विश्रांतिगृह उपलब्ध करून देण्याइतकी जागाही काही महाविद्यालयांकडे नाही. अशा परिस्थितीत विद्यापीठाच्या सूचनेची अंमलबजावणी कशी करायची, असा प्रश्न एका प्राचार्यानी महाविद्यालयांची भूमिका मांडताना केला.