कल्याणच्या रिक्षा संघटनांनी महिलांसाठी वाहनतळावर स्वतंत्र रांग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील वाहनतळावरून महिला प्रवाशांना स्वतंत्र रांगेतून रिक्षा सोडण्यात येत आहेत. या वाहनतळांवर पुरुषांसाठी स्वतंत्र रांग असणार आहे, असे रिक्षा संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी सांगितले.
मागील काही वर्षांपासून महिला प्रवाशांकडून महिलांसाठी रिक्षेची स्वतंत्र रांग असावी म्हणून मागणी करीत आहेत. रिक्षांची उपलब्धता, चालकांची मानसिकता यामुळे याविषयी एकमत होत नव्हते. मात्र कल्याण स्थानकात महिलांसाठी रिक्षेची स्वतंत्र रांग असावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. वेगवेगळ्या रिक्षा संघटनांनी यासंबंधी सकारात्मक भूमिका घेतल्याने महिला रांगेचा विषय मार्गी लागला आहे, असे पेणकर यांनी स्पष्ट केले. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील वाहनतळावर संध्याकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत रिक्षेसाठी प्रवाशांना मोठी धावाधाव करावी लागते. या झटापटीत महिला प्रवाशांचे हाल होतात. अनेक रिक्षा चालक प्रवाशांची अडवणूक करून वाढीव भाडे आकारून प्रवासी वाहतूक करीत असल्याचे संघटनांच्या निदर्शनास आले. कल्याण शहर पश्चिमेकडील बाजूस खडकपाडा, गोदरेज हिल, गंधारे, पूर्व भागात नेतिवली, पत्रीपूल भागात विस्तारत आहे. नवीन कल्याण भागात जाण्यासाठी रिक्षेशिवाय दुसऱ्या वाहनाची सोय नाही. ‘केडीएमटी’च्या बसेस आहेत, मात्र त्यांच्या वेळेचे नियोजन नसते. प्रवासी या बसवर अवलंबून राहात नाहीत. अनेक पुरुष नोकरदार मंडळी आपली वाहने रेल्वे स्थानक भागात आणून ठेवतात. या सगळ्या व्यवस्थेत नोकरदार महिलांची सर्वाधिक गैरसोय होत होती. लोकलमधील खचाखच गर्दीत होणारी ओढाताण आणि रिक्षा मिळण्यासाठी पुन्हा करावा लागणारा द्रावीडी प्राणायाम यामुळे महिलांचे हाल होतात. त्यामुळे महिलांसाठी रिक्षेची स्वतंत्र रांग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्गशीर्ष महिन्यात महिलांना एक कायमस्वरूपी चांगली भेट देण्याचा रिक्षा संघटनांचा प्रयत्न आहे. या स्वतंत्र रांगेतून पुरुष प्रवासी प्रवास करू शकणार नाहीत, असे प्रकाश पेणकर यांनी स्पष्ट केले.