नवी मुंबई पालिका हद्दीतून वगळण्यात आलेल्या शीळफाटा परिसरातील १४ गावांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतंत्र पाणीपुरवठा राबविण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. पालिका हद्दीतून वगळल्यापासून गेले सात ते आठ वर्षे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत होती.
नवी मुंबई पालिका हद्दीतून वगळल्यापासून या गावांमधील सार्वजनिक सेवा देण्याचे काम पालिका प्रशासनाने थांबविले होते.
कल्याण तालुक्यात ही चौदा गावे वर्ग करण्यात आली आहेत. या गावांना सुविधा देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आली होती. मनसेचे आमदार रमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य व मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद (राजू) पाटील यांनी एमआयडीसी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून चौदा गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना शासनाने सुरू करावी म्हणून गेले पाच ते सहा वर्षांपासून पत्रव्यवहार केला होता.
एमआयडीसीने दहिसर, वाकळण, उत्तरशीव, गोठेघर, वालीवली, मा़णिकपाडा, भंडार्ली, मोकाशीपाडा, पिंपरी, नवाळी, निघु, नागाव, बामाल्ली, बाळे, नारवली या गावांसाठी साडेसहा कोटी रुपयांची स्वतंत्र पाणी योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. एमआयडीसीच्या कल्याण फाटा (शीळ) येथील जलवाहिनीवरून १० गावांना व तळोजा येथील जलवाहिनीवरून ४ गावांना पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले. एमआयडीसीकडून ४ रुपये ५० पैसे प्रति घनमीटर या दराने चौदा ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.