महिलांच्या संदर्भातील फौजदारी खटल्याचे काम येथील जिल्हा न्यायालयात आता १ फेब्रुवारीपासून महिला न्यायाधिशांपुढे चालणार आहे. त्यासाठी प्रधान जिल्हा न्यायाधीश जयंत कुलकर्णी यांनी या पदावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. एस. वाघमोडे यांची नियुक्ती केली आहे.
पोटगी (कलम १२५), महिलांचा घरगुती छळ प्रतिबंधक कायदा २००५, विवाहितांच्या छळाचे खटले (कलम ४९८ अ) आदी खटले या न्यायालयापुढे चालतील. या न्यायालयात स्वतंत्र महिला पोलीस प्रॉसिक्युटरचीही नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे महिलाविषयक खटले लवकर निकाली निघतील, अशी अपेक्षा व्यक्त करत शहर वकील संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कराळे, उपाध्यक्ष अनिल सरोदे तसेच कार्यकारिणीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दि. १० सप्टेंबर २००५ रोजी जिल्हा न्यायालयाच्या आवारात नवीन इमारतीच्या पायाभरणीच्या कोनशिलेचे अनावरण करताना तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दलबिरसींग भंडारी यांनी नगरला एक कौटुंबिक न्यायालय व धनादेश न वटल्याच्या गुन्ह्य़ांची दोन स्वतंत्र न्यायालये सुरु करण्याचे जाहीर केले होते. धनादेश न वटल्याच्या गुन्ह्य़ांचे न्यायालय सुरु झाले, मात्र कौटुंबिक न्यायालय जागेअभावी सुरु झाले नाही. जागेसाठी वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष मंगेश दिवाणे यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला, मात्र अद्याप जागा उपलब्ध झाली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2013 1:09 am