शहर महापालिकेकडे नोंदणी केलेल्या २ हजार ८८१ पकी केवळ ४५२ व्यापाऱ्यांनी व्यवहाराच्या उलाढालीची विवरणपत्रे सादर केली. विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांना लवकरच कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येतील, अशी माहिती आयुक्त सुधीर शंभरकर यांनी दिली.
शहरात गेल्या १ नोव्हेंबरपासून स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला. स्थानिक संस्था करासाठी २ हजार ८८१ व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे नोंदणी केली. महाराष्ट्र महापालिका स्थानिक संस्था कर नियम २९ (१) अन्वये गेल्या ३१ मार्चपर्यंतच्या उलाढालीचे विवरणपत्र ३० जूनपर्यंत सादर करणे बंधनकारक होते. या बाबत स्थानिक संस्था कर विभागाकडून व्यापारी असोसिएशनच्या  अध्यक्षांना लेखी पत्र पाठवून व वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देण्यात आली. प्रत्येक व्यापाऱ्याला एसएमएसद्वारेही विवरणपत्र दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु व्यापाऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. केवळ ४५२ व्यापाऱ्यांनी विवरणपत्र सादर केले. या विवरणपत्राच्या सत्यतेची खात्री इतर विविध स्रोतांकडून सुरू आहे.
मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावताना केलेल्या कसुराबद्दल ५ हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला जाऊ शकतो. काही व्यापारी मागील काही महिन्यांपासून संशयास्पद प्रमाणात कमी स्थानिक संस्था कराचा भरणा करीत आहेत. त्यांचे व्यवहारही तपासण्यात येतील. या सर्व बाबींची नोंद व्यापाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे.