अन्न व औषधी प्रशासनाकडून कायद्याचा बडगा दाखवून औषधी व्यावसायिकांना वेठीस धरण्यात येत असल्याने केमिस्ट संघटनेने आपले व्यवसाय परवाने सरकारला परत करण्याचा इशारा दिला. याचा फार्मासिस्ट समन्वय समितीने निषेध केला. हा दबाव टाकण्याचा प्रकार असला, तरी फार्मासिस्ट समन्वय समितीने औषध वितरण सेवा सुरू ठेवण्याचा निर्धार केला.
समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केमिस्ट असोसिएशनच्या वतीने परवाने परत करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय रुग्णांना वेठीस धरणारा असला, तरीही फार्मासिस्ट रिटेलर आपले परवाने परत करणार नाहीत. तसेच राज्यातील २० हजार फार्मासिस्ट औषध वितरण सेवा सुरळीत ठेवण्यास प्रयत्नशील राहतील, असे पत्रकात नमूद केले आहे.
महाराष्ट्रातील सर्व औषध विक्रेता संघटनांची दोन दिवसीय बैठक शिर्डीत नुकतीच झाली. रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, परवाने परत करण्याच्या पोकळ धमक्यांना न जुमानता ‘एफडीए’ने कारवाई चालू ठेवावी, फार्मासिस्ट रिलेटलरच्या वतीने सेवा देणे चालू ठेवले असेल तर त्यांना औषधी देण्यास नकार मिळाल्यास संबंधितांचे परवाने रद्द करा, आदी मागण्यांचे निवेदन समितीच्या वतीने सरकारला देण्यात येणार आहे. अधिकाधिक फार्मासिस्टने स्वत: ठोक औषध विक्रीचे परवाने काढावेत व कोणाच्याही दबावास बळी न पडता आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवेदनात आहे. उमेश खके यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी फार्मासिस्ट समन्वय समितीच्या वतीने १५ जुलैनंतर केमिस्ट असोसिएशनच्या परवाने परत करण्याच्या पाश्र्वभूमीवर औषधी सेवा देण्याचे ठरविले आहे.