शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपूल साकारल्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीच्या समस्या कमी होतील ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली असून उलट सव्‍‌र्हिस रोडवर ठिकठिकाणी रासबिहारी चौफुलीप्रमाणे अपघात, वाहनांची कोंडी असे प्रकार घडत आहेत. उड्डाण पुलाखालील सव्‍‌र्हिस रोडवरील अनेक चौक कमी-अधिक प्रमाणात या समस्येतून जात असून  यासंदर्भातील शहरवासियांच्या समस्या सोडविण्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याची त्या त्या भागांची व्यथा आहे. रासबिहारी चौफुलीवर वारंवार अपघात होत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपण जणूकाही या गावचेच नाहीत अशी भूमिका घेतली आहे. अशीच उदासिनता सर्वत्र दिसून येत आहे. उड्डाण पुलालगत असणाऱ्या ठिकठिकाणच्या चौफुल्या, सव्‍‌र्हिस रोडच्या समस्या यांचा थोडक्यात आढावा.
फाळके स्मारक
पाथर्डी चौकातून पुढे जाताना फाळके स्मारकासमोर तर सव्‍‌र्हिस रोड वाहनधारकांसाठी आहे की उड्डाण पुलासाठी हा प्रश्न पडतो. या ठिकाणी सव्‍‌र्हिस रोडची रूंदी पुलाला दगडांचा लांबलचक आधार देण्यासाठी अतिशय कमी ठेवण्यात आला आहे. शहरातील इतर भागात सव्‍‌र्हिस रोडची रूंदी जितकी दिसते, त्यापेक्षा या ठिकाणी अतिशय कमी आहे.
पाथर्डी फाटय़ालगतचे फलक
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने उड्डाण पुलाखाली ठिकठिकाणी वाहने उभी करू नयेत असे फलक उभारले आहेत. वाहनधारकांप्रमाणे कदाचित वाहतूक पोलिसांना ही बाब ज्ञात नसावी. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून अशा फलकांशेजारी बिनदिक्कतपणे वाहने उभी केली जातात. छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांनी बळकावलेला भाग त्याहून वेगळा आहे. परंतु, वाहतूक पोलीस सर्वच ठिकाणी धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरताना दिसतात.
कन्नमवार पुलालगतचा परिसर
द्वारका ते कन्नमवार पुलादरम्यानच्या परिसरात एका विशिष्ट ठिकाणी पुलाखालून सव्‍‌र्हिस रोडवर जाण्याची व्यवस्था आहे. या भागात दोन्ही बाजूला उड्डाण पुलाखालून जाणारा मार्ग तसेच सव्‍‌र्हिस रोड असे चार रस्ते आहेत. या सर्व रस्त्यांवरून वाहनधारक पलीकडे मार्गस्थ होताना समोरून येणाऱ्या वाहनांचे अडथळे येतात. सिग्नल यंत्रणा वा वाहतूक पोलीस नसल्याने वाहनधारकांचा मनमानी कारभार या ठिकाणी पहायला मिळतो.
लेखानगर (बालभारती)
सव्‍‌र्हिस रोड जणू आपल्याच मालकीचा आहे. असा थाट स्थानिक राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा आहे. कारण, उड्डाणपुलालगतचा सव्‍‌र्हिस रोड संबंधिताच्या १५ ते २० मालमोटारींनी व्यापला आहे. महामार्गाच्या विस्तारीकरणात शेकडो झाडे तोडण्यात आली. मात्र, या ठिकाणच्या निलगिरीच्या झाडांना जीवदान देण्यात आले. या झाडांमुळे या ठिकाणी सव्‍‌र्हिस रोड चिंचोळा झाला आहे. मार्गस्थ होणाऱ्या वाहनांच्या संख्येचा विचार करता रस्त्यावर बिनदिक्कतपणे उभ्या राहिलेल्या मालमोटारीतून शिल्लक राहिलेल्या रस्त्यावरून वाहनधारक कसा मार्ग काढत असतील याचा विचार न केलेला बरा.
गोविंदनगर
महामार्गावरील प्रकाश हॉटेलच्या मागील भागात (गोविंदनगर) वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना मुंबई नाका चौकातून घरी जाण्यासाठी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या समोरील भुयारी मार्गापर्यंत सव्‍‌र्हिस रोडवरून आधी पुढे जावे लागते. भुयारी मार्गातून पलिकडच्या रस्त्यावर जाऊन त्यांना घराकडे मार्गस्थ होता येते. म्हणजे, उपरोक्त भागातील नागरिकांना अर्धा ते पाऊण किलोमीटरचा नाहक वळसा घालावा लागतो. ज्यांना असा वळसा घ्यायचा नाही ते, वाहनधारक मुंबई नाक्यालगतच्या चौफुलीच्या पलीकडील सव्‍‌र्हिस रोडने प्रकाश हॉटेलकडे विरुध्द दिशेने जीव मुठीत धरून मार्गस्थ होताना दिसतात. या सव्‍‌र्हिस रोडवर समोरून भरधाव वाहने येत असताना स्थानिकांना दररोज ही जीवघेणी कसरत करावी लागते.
मुंबई नाका चौक
शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरील मुंबई नाका चौकातील वाहतुकीचे व्यवस्थापन करताना खुद्द या विभागाची दमछाक होत असेल तर वाहनधारकांची काय स्थिती होईल याचा विचार करता येईल. जवळपास १३ रस्ते या ठिकाणी एकत्र येतात. शहरातून सव्‍‌र्हिस रोडवरून जाणाऱ्या वाहनधारकाला द्वारकाकडील रस्त्यांवरून वाहनांपासून स्वत:चा बचाव करत मार्ग शोधावा लागतो. भाभानगरकडून येणाऱ्या वाहनांना त्याच पध्दतीने शहरात जाताना मार्गक्रमण करावे लागते. वाहतूक बेटाच्या भव्य आकारामुळे वाहने खोळंबून राहतात. सकाळी व सायंकाळी ही स्थिती कायमच दिसते. हॉटेल किनाऱ्याजवळील रस्ता एकेरी आहे. तसा फलकही तिथे झळकतो. पण, वाहनधारक कोणाची पत्रास ठेवत नाही. वाहनधारकांना पकडण्यात पोलीस मग्न होत असले तरी वाहतूक कोंडीकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होते, अशी वाहनधारकांची तक्रार आहे.
गोविंदनगरसमोरील भुयारी मार्ग
उड्डाण पुलाखालील सर्वात विचित्र मार्ग म्हणजे गोविंदनगर समोरील भुयारी मार्ग म्हणता येईल. वास्तविक, तिडके कॉलनी, गोविंदनगर, भुजबळ फार्म आणि महामार्गापलीकडील इंदिरानगर, कमोदनगर या परिसरास जोडणारा हा महत्वाचा भाग आहे. या ठिकाणी महामार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणा नसली तरी पोलीस वाहतुकीचे नियमन करतात. ज्या रस्त्यावर लांबलचक वाहनांची रांग असेल, त्यांना मार्गस्थ होण्याकरिता जादा वेळ दिला जातो. परिणामी, उर्वरित रस्त्यांवर वाहनधारक ताडकळत राहतात. शिवाय, वाहनांना मार्ग खुला करण्याचे नियोजन नसल्याने एका बाजुला भुयारी मार्गाखालून वाहने मार्गस्थ होत असतात, आणि तेव्हाच पलीकडच्या सव्‍‌र्हीस रोडवरून वाहने सरळ दिशेने निघालेली असतात. यामुळे उड्डाण पुलाचे काम होण्याआधी या चौकात वाहतूक कोंडीचे जे विदारक चित्र होते, ते हा पूल पूर्णत्वास जाऊनही बदललेले नाही.
पाथर्डी फाटा
वेगवेगळ्या सहा बाजूंनी येणारी सर्व प्रकारची वाहने पाथर्डी फाटा चौकात परस्परांसमोर उभी ठाकतात. या चौकातील सिग्नल यंत्रणा केवळ शोभेचे बाहुले ठरले आहे. कारण, आजतागायत कधी ती सुरूच झालेली नाही. पाथर्डीकडून या चौकात येणारी, राणेनगरकडून फाळके स्मारककडे जाणारी, फाळके स्मारककडून पलिकडच्या सव्‍‌र्हिस रोडवर जाणारे तसेच अंबड औद्योगिक वसाहत आणि सिडकोतून फाळके स्मारक, पाथर्डीकडे जाणाऱ्या अशा सर्व वाहनांचा संयोग या चौफुलीवर होतो. वाहतूक निरीक्षक एका बाजूला थांबत असल्याने पलिकडे वाहतुकीचा काय बोजवारा उडाला हे त्यांच्या गावी नसते. या चौकात मद्याच्या दुकानासह छोटय़ा-मोठय़ा टपऱ्या आहेत. आता भाजी विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. कसाऱ्याला प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा हा थांबा आहे. एकूणच ही स्थिती नेहमीच अपघातांना निमंत्रण देणारी ठरते.
स्टेट बँक चौक
या परिसरात छोटय़ा खाद्य विक्रेत्यांनी अनधिकृत चौपाटी वसविली आहे. त्यामुळे हा परिसर ‘चौपाटी’ म्हणूनही ओळखला जातो. राणेनगरकडून मुंबई नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि सिडकोतून राणेनगरकडे जाणाऱ्या या सव्‍‌र्हिस रोडची वेगळीच तऱ्हा आहे. उड्डाणपूल आणि सव्‍‌र्हिस रोड यातील बहुतांश जागा अनधिकृत खाद्य विक्रेत्यांनी बळकावली आहे. सायंकाळी खवय्ये व मद्यपींची येथे तोबा गर्दी होते. मग, सव्‍‌र्हिस रोडवर वाहने उभी केली जातात. हे कमी म्हणून की काय, यालगत एक वाहन बाजार भरतो. संबंधित व्यावसायिकाने सव्‍‌र्हिस रोडवर दुतर्फा वाहनांचा हा बाजार थाटला आहे. रस्त्याच्या बिकट अवस्थेतून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या तिखट फोडणीमुळे डोळे चोळत बसण्याची वेळ येते. चौपाटीसमोरील चौकात त्रिकोणी स्वरुपाचा पट्टा मोकळा आहे. त्याचे डांबरीकरण झाल्यास वाहनधारकांना काहिसा दिलासा मिळू शकतो. पण, याचा विचार कोण करणार असा स्थानिकांचा प्रश्न आहे.
द्वारका चौक
अभूतपूर्व वाहतूक कोंडी असणारा द्वारका चौक उड्डाण पुलाची निर्मिती झाल्यावरही मोकळा श्वास घेऊ शकलेला नाही. नाशिक-पुणे महामार्गासह जवळपास आठ रस्ते या ठिकाणी एकत्र येतात. दिवसभरात सर्वाधिक वाहने मार्गस्थ होणारा हा चौक. त्यालगत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस, धुळे व मालेगाव प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी व जीप, रिक्षा थांबा आणि अगणिक गॅरेज यामुळे या चौकाकडे येणारा सव्‍‌र्हिस रोड सर्व प्रकारच्या वाहनांचा तळ बनला आहे. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर होतो. शिवाय, याच भागातून उड्डाण पुलावर जाण्यासाठी मार्ग आहे. या चौकातून मार्गस्थ होणाऱ्या स्थानिक वाहनांची संख्या प्रचंड असूनही पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग साकारण्याची किमया साधली गेली. पादचारी तर भुयारी मार्गातून जात नाहीच, पण वाहनधारकांची कोंडी काही केल्या सुटलेली नाही. पादचाऱ्यांऐवजी वाहनधारकांसाठी येथे भुयारी मार्गाची गरज होती. या कोंडीत सापडणारा प्रत्येक वाहनधारक अत्यवस्थ होतो. त्यात कोंडीत जर एखादा अत्यवस्थ रुग्णच सापडला तर त्याचे काय होईल हे कोणी सांगू शकत नाही.