शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साकारलेल्या उड्डाण पुलामुळे अंतर्गत वाहतुकीचे तीनतेरा वाजले असताना दुसरीकडे हे विस्तारीकरण अनेक चौकांना ‘अपघात चौक’ बनविण्यास कारक ठरल्याचे वारंवार होणाऱ्या अपघातांनी सिध्द झाले आहे. या महामार्गावर रासबिहारी चौफुली, द्वारका चौक, मुंबई नाका, आडगाव नाका आदी भागात भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी धोकादायक चौफुली ठिकाणी भुयारी मार्ग तयार करावे, असे साकडे शिवसेनेच्या वाहतूक शाखेने सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना घातले आहे. टोलच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वी मनसेने आक्रमकपणे आंदोलन छेडले असताना शिवसेनेने महामार्गावरील वाहतुकीच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सनदशीर मार्ग स्वीकारला आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शहरात लांबलचक उड्डाण पूल साकारण्यात आला. उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडीचा विषय कायमस्वरुपी मार्गी लागेल ही अपेक्षा काही महिन्यांत फोल ठरली. उलट या पुलामुळे शहरवासीयांच्या समस्यांमध्ये वाढच झाली असल्यावर ‘लोकसत्ता – नाशिक वृत्तान्त’ने सातत्याने प्रकाशझोत टाकला आहे. द्वारका चौफुली, मुंबई नाका परिसरातील स्थितीचे अवलोकन केल्यास वाहतूक कोंडीचा विषय किती जटील बनला हे सहजपणे लक्षात येते. द्वारका चौफुलीच्या भागात रिक्षा, टॅक्सी व जीप या प्रवासी वाहतुकीच्या गाडय़ांसाठी अधिकृत थांब्याची व्यवस्था नाही. परिणामी वाहनधारक सव्‍‌र्हिस रोडवर मनाला वाटेल तिथे वाहने उभी करतात. या चौकात परस्परांना येऊन मिळणाऱ्या रस्त्यांची संख्या मोठी असली तरी वाहतूक नियंत्रणाचे काम केवळ चार पोलीस करतात. चौकातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांच्या तुलनेत ही संख्या तोकडी आहे. रिक्षा व टॅक्सीला योग्य ठिकाणी अधिकृत थांबे उपलब्ध झाल्यास चौकातील वाहतूक कोंडी काहीअंशी कमी होईल, असे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिमभाई सय्यद यांनी म्हटले आहे. मुंबई नाका परिसरातील वाहतूक बेटाचा आकार कमी करून वाहतुकीचे नियमन करता येईल, असेही त्यांनी सुचविले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर हनुमाननगर परिसरात रासबिहारी शाळेलगत धोकादायक चौफुली आहे. या चौकात सिग्नल यंत्रणा नसल्याने सर्व वाहने भरधाव जात असतात. स्थानिक वाहनधारकांना महामार्ग ओलांडणे अवघड झाले आहे. या ठिकाणी आजवर अनेक अपघात घडले. कित्येक वाहनधारकांना जीव गमवावा लागला. या चौफुलीवर म्हसरुळकडून येणारा रस्ता जोडला जातो. वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन या चौकात भुयारी मार्गाची नितांत आवश्यकता असल्याचे वाहतूक सेनेने म्हटले आहे. महामार्ग विस्तारीकरणामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीच्या निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी वाहतूक सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.