नेवासे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा शुभारंभ फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची माहिती नेवासे वकील संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब टेमक यांनी दिली.
नेवासे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व्हावे यासाठी वकील संघाने सन २०१० मध्ये तसा प्रस्ताव उच्च न्यायालयाकडे पाठवला होता. त्यासंदर्भात लागणाऱ्या सर्व बाबींचा पाठपुरावा वकील संघाचे अध्यक्ष टेमक व तत्कालीन अध्यक्ष गणेश वैद्य यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केला होता. उच्च न्यायालयाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून लागणाऱ्या निधीस मंजुरी मिळणे आवश्यक होते. याबाबत आमदार शंकर गडाख यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. अर्थ खात्याकडून निधी उपलब्ध घेतल्यावर तत्कालीन मुख्य सचिव अंचलिया यांच्याकडे पाठपुरावा करून प्रशासकीय मंजुरी मिळविली. त्यानंतर संयुक्त समितीची मंजुरीदेखील घेण्यात आली. या न्यायालयासाठी १५ पदांना मंजुरी मिळाली व ४ पदे कंत्राटी पद्धतीने मान्य झाली आहेत. हे न्यायालय फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.