गायन, वादन, निवेदन व शिल्प अशा चारी कलांचे सादरीकरण एकाचवेळी करणारा इंद्रधनू कार्यक्रम सादर करून अनुनाद या संस्थेने नगरच्या सांस्कृतिक जगतात एक नवाच इतिहास रचला. रसिकांनीही अलोट गर्दी करून या अभिनव उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
प्रोफेसर कॉलनी चौकात नव्यानेच झालेल्या राजमोती लॉनवर रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. त्यात प्रथमेश लघाटे, योगिता गोडबोले यांचे सुरेल गायन झाले. त्यानंतर अमर ओक यांचे नादमधूर बासरीवादन, निलेश परब यांची अप्रतिम नादाची ढोलकी व जणू बोलच बोलत आहे अशी तन्मय देवचके यांची संवादिनी अशी जुगलबंदी रंगली. बासरी, ढोलकी, व संवादिनी यातील श्रेष्ठ काय असा प्रश्नच निर्माण झाला नाही इतकी एकरूपता या वादनात होती.
यापेक्षाही बहारदार कार्यक्रम झाला तो बालंगधर्व या चरित्रपटात बालगंधर्वाची अजोड भुमिका साकारणाऱ्या सुबोध भावे याच्या मुलाखतीचा. पुण्याच्या मिलिंद कुलकर्णी याने ही मुलाखत घेतली. ती रंगली त्याचवेळी शिल्पकार प्रमोद कांबळे साकारत असलेल्या बालंगधर्वाच्या शिल्पाकृतीने. मातीत साकारलेली ही एकाबाजूला गंधर्व व त्यांच्याच पाठीलापाठ लावून असलेली त्यांचीच स्वरूपसुंदर नायिका. शिल्प पुर्ण झाले त्यावेळी सारेच रसिक शब्दश मंत्रमुग्ध झाले होते.
सगळेच कलाकार त्यामुळे भारावून गेले, मात्र त्यातही खरी दाद दिली सुबोध भावे याने. तो म्हणाला नगरची जनता अशी कलासक्त आहे हे लवकर लक्षात येत नाही. आता मात्र मलाच काय पण या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बाहेरच्या प्रत्येक कलावंताला आपले मत बदलून घ्यावेच लागेल. अनुनाद चे तर किती कौतुक करावे व किती नाही असे उपस्थित रसिकांना झाले होते. तन्मय देवचके व त्याच्या सहकाऱ्यांना त्यांनी शाबास असे म्हणत पाठीवर थाप दिली व आपल्या भावना व्यक्त केल्या.