खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इचलकरंजीतील मटका किंग व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष आसिफ नसीरखान पठाण याच्यासह सात जणांच्या टोळीला पोलिसांनी बुधवारी अटक केली. पठाण याचा भाऊ तौफिक व द्वारकाधीश खंडेलवाल या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलीस अधीक्षकांनी त्यांना तडीपार केले होते. सात आरोपींना न्यायालयात दाखल केले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.    
मलिकजान नसीरसाब देवरमनी (वय ३३, भोनेमाळ, इचलकरंजी) यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. देवरमनी यांच्या मालकीचे दोन ट्रक होते. त्यासाठी त्यांनी फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले होते. त्यांचे दोन्ही ट्रक आसिफ पठाण याने भाडय़ाने घेतले होते. तेव्हा देवरमनी यांनी फायनान्स कंपनीचे हप्ते व भाडे वेळेवर अदा करावेत असा करार केला होता. मात्र आसिफ याने तीन-चार महिने कसलेही पैसे अदा केले नाहीत. फायनान्स कंपनीची नोटीस आल्यानंतर देवरमनी यांना हा प्रकार कळला.    
त्याबाबतची चौकशी देवरमनी करत होते. त्यांना त्यांचा ट्रक कबनूर येथील नितीन स्वामी यांच्या घरासमोर इंजिन व गिअर बॉक्स काढलेल्या अवस्थेत दिसून आला. देवरमनी यांनी पठाण यास छेडले असता त्याने ट्रक पाहिजे असेल तर दरमहा २५ हजार रुपयांची खंडणी आणून द्यावी, अन्यथा ठार मारण्यात येईल अशी धमकी दिली. त्यावर देवरमनी यांनी आसिफ पठाण, त्याचा भाऊ तौफिक, समीर महबूब शेख, नितीन महादेव स्वामी, द्वारकाधीश जयनारायण खंडेलवाल, अनिल निवृत्ती लोहार व मस्तान आयुबखान पटेल यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली. आसिफ पठाण याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारी, हाणामारी असे गुन्हे दाखल आहेत. तर खंडेलवाल याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, पिस्तूल दाखवून खंडणी वसूल करणे आदी गुन्हे दाखल आहेत.