दरोडय़ाची टीप देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या कारणावरून शहर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी श्रीरामपूरच्या गुन्हेगारांना हाताशी धरून दत्तू वाघ या सराईत गुन्हेगाराचा खून केल्याच्या प्रकरणातील सात संशयितांना शुक्रवारी न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पाथर्डी शिवारात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर या घटनेला नाटय़मय वळण मिळाले होते. सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या दत्तू वाघला दोन पोलीस कर्मचारी घरून घेऊन गेले. तेव्हापासून बेपत्ता असलेल्या दत्तुचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिल्यावर खळबळजनक बाब पुढे आली. शहरातील महात्मानगर परिसरात एका बंगल्यावर दरोडा टाकून ८० कोटीची लूट करण्याची योजना दत्तू वाघच्या डोक्यात होती. त्याने ही बाब आपल्या सहकाऱ्यांजवळ बोलून दाखविली होती. त्याच्या साथीदारांनी तो बंगला दाखविण्यासाठी त्याच्याकडे आग्रह धरला. तेव्हा दत्तुने दरोडय़ातील अधिक हिस्सा मिळणार असल्यास हा बंगला दाखवू असे सांगितल्याने संबंधितांमध्ये वाद निर्माण झाला. यातून सोमवारी मध्यरात्री सर्वानी दत्तूला बोलावून घेतले आणि त्याचा खून करून ओळख पटू नये म्हणून चेहराही जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शहर पोलीस दलातील संदीप डावरे व सोमनाथ गुंड यांच्यासह श्रीरामपूर व खंडाळा येथील संदीप वाघमारे, पप्पू चव्हाण, दीपक फ्रान्सीस गायकवाड, राहुल महेंद्र यादव, दीपक राजनाथ यादव यांना अटक केली होती. या सर्वाना शुक्रवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांची २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, पोलीस दलातील डावरे व गुंड हे दोघे कर्मचारी आधीपासून वादग्रस्त असल्याचे सांगितले जाते. अनेक गुन्हेगारांशी त्यांचे निकटचे संबंध असल्याची चर्चाही पोलीस दलात होत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वरदहस्तामुळे त्यांच्यावर कारवाईस टाळाटाळ केली गेल्याचे बोलले जाते. एका गुन्हेगाराच्या खूनाच्या प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक झाल्यामुळे पोलीस यंत्रणा आणि गुन्हेगारांच्या संबंधांवर नव्याने प्रकाश पडला आहे.