१३४ देशातील १ लाख ३० हजार मुलांचा सहभाग
ग्रीसमध्ये झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय बालचित्रकला स्पर्धेत लालबागच्या सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके मिळविली आहेत. या स्पर्धेत जगभरातून १३४ देशातील १ लाख ३० हजार मुले सहभागी झाली होती.
   लालबागच्या ‘गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट’ या संस्थेकडून ही मुले स्पर्धेत सहभागी झाली होती. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या जागतिक दर्जाच्या स्पर्धेस आणि प्रदर्शनास कलाजगतात अनन्यसाधारण महत्व आहे.
सायली सावंत, सिद्धी घाडी, वेदिका भोसले, शीतल मोरे, वैदेही सावंत, प्रथमेश पाटील, श्रद्धा परब अशी या विद्यार्थ्यांची नावे असून स्पर्धेसाठी त्यांना संस्थेचे शिक्षक सागर कांबळी यांचे मार्गदर्शन लाभले होते. या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे होळी, गणेशोत्सव मिरवणूक, नवरात्र, गणपती विसर्जन, वटपौर्णिमा, गोंधळ, देवीची पूजा या विषयांवर चित्रे काढली होती.
या संदर्भात संस्थेचे प्राचार्य पृथ्वीराज कांबळी यांनी सांगितले की, स्पर्धेचे मुख्य आकर्षण असते ते सुवर्ण पदकांचे. प्रथम क्रमांकाच्या ५७ विद्यार्थ्यांना ही सुवर्णपदके मिळतात. यापैकी सात सुवर्णपदके आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना मिळाली. अन्य सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये गुजरात, आंध्र प्रदेशच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
गेल्या वर्षीही आमच्या संस्थेने याच स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळविली होती, असे कांबळी यांनी सांगितले.