भोईवाडा पोलीस ठाण्याचा शुक्रवारचा दिवस खास होता. कारण नवीन पोलीस अधिकारी मॅडम येणार होत्या. तिच्या स्वागतासाठी सारे पोलीस ठाणे सज्ज होते. दुपारी बारा वाजता पोलीस गाडीतून या मॅडम उतरल्या. सर्वानी तिला कडक सॅल्यूट ठोकला. मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीत बसल्या. हा सारा थाट रुबाब पाहून त्या मॅडमच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कारण पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न साकार झालं होतं. या मॅडम म्हणजे दुसरं कोणी नसून ७ वर्षांची चिमुकली मेहक सिंग होती. कर्करोगाने मृत्यूशी झुंज देत असलेल्या मेहकचं हे स्वप्न मेक अ विश फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पूर्ण केलं होतं.  महेक सिंग (७) ही उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढ जिल्ह्य़ात आई आणि लहान बहिणीसह राहते. तिचे वडील दिनेश सिंग मुंबईत इलेक्ट्रिशियनचं काम करतात. दोन वर्षांपूर्वी मेहकला हाडांचा कर्करोग असल्याचं समजलं. आई-वडिलांच्या पायाखालजी जमीन सरकली. पैशांची जुळवाजुळव करून तिच्यावर दीड वर्ष अलाहाबादच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार केले. पण परिस्थिती बिघडत चालली होती. एप्रिल २०१४ मध्ये तिला उपचारांसाठी परळच्या टाटा कर्करोग रुग्णालयात आणलं. पण तोपर्यंत हाडांचा हा कर्करोग ४ थ्या पायरीवर गेला होता. मेहकचा हाडांचा हा कर्करोग संपूर्ण शरीरात पसरला होता. फुप्फुसापर्यंत तो रुतत गेला. केमोथेरेपी, रेडियोथेरेपी सुरू करण्यात आली.
 दरम्यान, मेक अ विश फाऊंडेशन या स्वंयसेवी संस्थेला मेहकच्या या आजाराबद्दल समजलं. त्यांनी रुग्णालयात जाऊन मेहकची भेट घेतली. आजारात तिची रया गेली होती. बालवयातली निरागसता, उत्साह लोप पावला होता. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिला बोलतं केलं. मला पोलीस अधिकारी बनायचं आहे, ही इच्छा बोलून दाखवली. संस्थेने लगेच जवळच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तोंडवळकर यांची भेट घेतली. मेहकचं हे स्वप्न पूर्ण करण्यास त्यांनी तात्काळ मान्यता दिली.
..आणि मेहक पोलीस बनली
सध्या उपचारांसाठी मेहक टिटवाळ्यात राहते. शुक्रवारी तिला आई-वडिलांनी ट्रेनमधून दादरला आणले. तिला पोलिसाचा गणवेश घालण्यात आला. तिच्या स्वागतासाठी पोलीस गाडी सज्ज होती. पोलीस कर्मचाऱ्याने तिला कडक सॅल्यूट ठोकत दार उघडले. आज तू पोलीस अधिकारी बनली आहेस, असे तिला सांगण्यात आले. ती भोईवाडा पोलीस ठाण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तोंडवळकर यांच्या खुर्चीत तिला बसविण्यात आले. महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी बोरसे यांनी तिला पोलीस ठाणे फिरवले. बंदूक दाखवली, तुरुंग दाखवला. नवीन मॅडम आल्या म्हणून सगळे तिचा आदर करत होते. तिला सगळ्यांनी सॅल्यूट केला. दुपारी तिला पोलिसांच्या जीपमध्ये बसवून गस्तीवर नेण्यात आले.

’  पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाल्याने मेहक भारावली होती. मला पोलीस अधिकारी बनून देशाची सेवा करायची आहे, गुंडांना पक डून तुरुंगात टाकायचे आहे, असे मेहकने सांगितले.
’ उद्या मेहक तिच्या गावी परतणार आहे. कदाचित या पोलीस ठाण्यात ती पुन्हा परतणार नाही. पण साकार झालेलं स्वप्न, मिळालेला मान-सन्मान याची शिदोरी तिच्या उर्वरित आयुष्यात कायम राहणार आहे.

हाडांचा कर्करोग हा दुर्धर आजार आहे. तो का होतो त्याची निश्चित कारणं नाहीत. पण केवळ १० टक्के रुग्णच बरे होऊ शकतात. मेहकचा आजार गंभीर असून त्याने चौथी पायरी ओलांडली आहे. चमत्कारच तिला आयुष्य देऊ शकतो.
 डॉ. श्रीपाद बाणावळे,प्रमुख वैद्यकीय अधिकारी, टाटा रुग्णालय.

जेव्हा आम्ही लहान मुलांना त्यांची इच्छा विचारतो तेव्हा कुणाला सेलिब्रेटींना भेटायचं असतं, कुणाला खेळणी हवी असतात. मेहकने व्यक्त केलेली इच्छा आगळीवेगळी आहे. एक दिवसाची पोलीस अधिकारी बनल्यामुळे तिच्या जीवनात आनंद आला आहे, आत्मविश्वास मिळाला आहे. हाच आत्मविश्वास तिला जगण्याचं बळ देऊ  शकेल.
दीपक भाटिया,मुख्य कार्यकारी अधिकारी, मेक अ विश फाऊंडेशन.