News Flash

‘शकुंतला’ बंद केल्यास भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा

स्वातंत्र्योत्तर काळातही ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या आणि शकुंतला नावाने ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ-मूर्तीजापूर नॅरोगेज रेल्वे बंद करण्याचा जो घाट घातला जात आहे तो सफल होऊ देणार नाही.

| December 22, 2012 01:57 am

स्वातंत्र्योत्तर काळातही ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या आणि शकुंतला नावाने ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ-मूर्तीजापूर नॅरोगेज रेल्वे बंद करण्याचा जो घाट घातला जात आहे तो सफल होऊ देणार नाही. असा प्रयत्न झाल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन उभारून मूर्तीजापूर येथे रेल्वे बंद केली जाईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे.
यवतमाळ-मूर्तीजापूर ही रेल्वे आजही ब्रिटीश कंपनी क्लिक निक्सनच्या ताब्यात आहे. याच कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुलगाव-आर्वी आणि मूर्तीजापूर-अचलपूर या ‘दोन्ही शकुंतला’ रेल्वे क्रमाक्रमाने दुरुस्तीचे कारण दाखवून कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. यवतमाळ-मूर्तीजापूर ही शकुंतला रेल्वे १९५९ मध्ये सुरू झाली होती. ११७ कि.मी. अंतराची ही नॅरोगेज रेल्वे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होण्याचे सर्व प्रयत्न फसले असले तरी सेना खासदार भावना गवळी, खा. अनंतराव अडसुळ, भाजप खासदार हंसराज अहीर यांनी संसदेच्या याचिका समितीसमोर एक याचिका दाखल करून शकुंतलेला ब्राडगेजमध्ये रूपांतरित करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात याचिका समितीचे अध्यक्ष खासदार अनंत गिते यांच्यासमोर एक सुनावणीसुद्धा झाली असल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी दिली आहे. दरम्यान, शकुंतलेचे रूळ खराब झाले आहेत. या मार्गावरील गेट्ससुद्धा बिघडलेले आहेत. त्यांची दुरुस्ती करण्याचे निमित्त करून गेल्या चार महिन्यांपासून शकुंतलेची ये-जा बंद झाली आहे. त्यामुळे गरीब माणसांची जीवनरेखा असलेली शकुंतला पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे, पण रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही शकुंतला बंदच असल्यामुळे ती आता कायमची बंद करण्याचा घाट घातला जात आहे, अशी शंका जनमानसात निर्माण होत आहे.
शकुंतला बंद होऊ नये, अशी मागणी भाजप नेते अजय दुबे यांनी केली असून ती बंद करण्याचा घाट घातल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. अजय दुबे यांनी म्हटले आहे की, परिसरातील जनतेला रेल्वे आरक्षण करता यावे म्हणून दारव्हा रेल्वे स्थानकावर कारंजा व यवतमाळप्रमाणे संगणकीकृत रेल्वे आरक्षण सुरू करण्यात यावे, वर्धा-नांदेड हा नवीन प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वेचे काम जलद सुरू करून दारव्हा मोतीबाग हे ब्रिटीशकालीन रेल्वे जंक्शन पूर्ववत करावे, जेणेकरून कापसाच्या गाठींची संपूर्ण देशात वाहतूक करण्याकरिता म्हणून जंक्शनच्या सर्व सोयी सुविधा दारव्हय़ात उपलब्ध करून देण्यात याव्या. अन्यथा, परिसरातील जनतेसह भाजपच्यावतीने मूर्तीजापूर येथे रेलरोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रा. अजय दुबे, सुधीर अलोणे, गजानन महल्ले, आनंद दुबे, पांडुरंग मापारे, मदन चंदन, अमर दुबे, सुनील पेहीवाल, शेख अफजल, प्रल्हाद शिवधारकार, मन्हू कोठारी, अंकुश ताजणे, मंगेश कानपुरे, जितेश दुधे, अमोल यळणे यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2012 1:57 am

Web Title: sever agitation warning by bjp if shakuntala railway shut down
टॅग : Bjp,Railway,Warning
Next Stories
1 विदर्भाच्या वाटय़ाचा निधी अन्यत्र वळविला जाणार नाही
2 पं.हृदयनाथ मंगेशकरांच्या गायनाने कीर्तन महोत्सवाचा समारोप
3 अंगणवाडी सेविकांचा गनिमी कावा
Just Now!
X