विकासाचे नवे टप्पे गाठणाऱ्या उपराजधानीतील अनेक इमारतींमध्ये कायमस्वरूपी आग विझवण्याची यंत्रणा आणि उद्वहन देखभाल-दुरुस्ती या दोन्ही आघाडय़ांवर सध्या अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. शहरात गेल्या काही वर्षांत उंच इमारतींचे जाळे उभे राहत असताना यंत्रणा बसवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बहुतांश इमारतींमधील अग्निशमन उपकरणे देखभालीअभावी धूळखात पडून असल्याचे चित्र आहे. काही इमारतींमध्ये आग विझवण्याची यंत्रणा असली तरी ती बंद असल्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी त्यांचा काहीही उपयोग नसल्याचे दिसून आले.
शहरातील विविध भागात उंच इमारती आहेत, त्या ठिकाणी उद्वहन यंत्रांची व्यवस्था असली तरी त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसल्याचे विभागाच्या लक्षात आले आहे. साधारणत: उन्हाळा सुरू झाला की अग्निशमन विभाग शहरातील विविध भागात सर्वेक्षण करीत असते. इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे, पण बहुतांश ठिकाणी ती नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण करून शहरातील ७०० पेक्षा इमारत आणि अपार्टमेंट मालकांना नोटीस देऊन तात्काळ उद्वहनाच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनेक लोकांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वेक्षण करून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आता कारवाई सुरू केली आहे.
इमारतीमध्ये उद्वहन यंत्रासाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्यानंतर त्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. उद्वहनाच्या परवान्याचे नूतनीकरण होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाहणी करून या परवान्याचे नूतनीकरण केले जाते. मात्र, उपराजधानीतील सुमारे दोनहजार पेक्षा अधिक इमारतींनी त्याचे नूतनीकरण केले नसल्याची माहिती मिळाली. काही इमारतींच्या मालकांना अग्निशमन दलाने नोटिसा बजाविल्या होत्या. इमारतींमधील आग विझवण्याची यंत्रणा पूर्ववत करून घ्या, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, अजूनही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील अनेक खासगी रुग्णालयामधील उद्वहनात अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली आहे मात्र, बहुतांश ठिकाणी ही यंत्रणा नादुरस्त असल्याची बाब समोर आली आहे. अशा रुग्णालयांना महापालिकेच्या अग्निशामक विभागातर्फे नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी सांगितले, उद्वहनाच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा असावी असा नियम असताना जे लोक त्याचे पालन करीत नाहीत, त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी अशा इमारतीचे सर्वेक्षण केले जाते. शहरात नव्याने इमारती उभारल्या जात असताना उद्वहनासंदर्भात नियमांचे पालन केले जात असले तरी अग्निशमन यंत्रणा बघितल्यावरच त्याची पाहणी करून ना हरकत प्रमाणपत्र दिले जात आहे.