केंद्रातील भाजप सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि पुढील कार्यक्रमांच्या दृष्टिकोनातून योग्य दिशा देण्यासाठी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित ‘जनकल्याण पर्व’ मेळाव्यात कार्यकर्त्यांपेक्षाही विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी हा चर्चेचा विषय ठरला.
भाजपने वर्षभरात काय केले, याचा लेखाजोखा मांडण्यासाठी बुधवारी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात ‘जनकल्याण पर्व’चे आयोजन करण्यात आले होते. नियोजित कार्यक्रमानुसार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे मेळाव्यास मार्गदर्शन करणार होते. परंतु जवळच्या नातेवाईकाच्या निधनामुळे दानवे मेळाव्यास अनुपस्थित राहिल्याने महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यावर सर्व जबाबदारी आली. त्यातच नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम उशीरा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला. बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे या आमदारांसह शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, गोपाळ पाटील, महिला आघाडीच्या पुष्पा शर्मा आदींच्या उपस्थितीत मेळाव्यास सुरूवात झाली. यावेळी रहाटकर यांनी मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील वातावरण कसे बदलले आहे, याविषयी माहिती दिली. मोदींनी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर शेजारील देशाशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यास सुरूवात केली. काहींना कडक शब्दात समज दिली. नियोजन करतांना प्रत्यक्ष कामांकडे त्यांचा भर राहिला आहे. देशाचा विकास होत असतांना अंतर्गत पातळीवर तळागाळातील जनतेच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी जनधन योजना, अटल सेवा निवृत्ती योजना यांसह विविध योजना सुरू केल्या, असे नमूद केले. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध योजना आणत असतांना निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ‘हिम्मत अ‍ॅप’ अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. येत्या काही दिवसात ते नजीकच्या पोलीस ठाण्यांमध्ये कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मेळाव्याच्या प्रारंभी असणारी गर्दी ही रहाटकरांच्या भाषणापर्यंत काहीशी ओसरली होती. सभागृहामागील भाग पूर्णपणे रिकामा असताना त्या ठिकाणी शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यांचे आपआपसात विनोद, शेरेबाजी, भ्रमणध्वनीवरील खेळ सुरू असतांना त्यांना हटकण्याची तसदी पोलीस किंवा कार्यकर्त्यांनी घेतली नाही.