ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांना शिवप्रिया शांती व होमिओपॅथ विलास डांगरे यांना यंदाचा सेवाव्रती पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवप्रिया उद्योग समूहाच्या प्रतिभा शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
शिवप्रिया उद्योग समूहाशी संलग्नित महादेवराव भोरकर ट्रस्ट व प्रिया जाधव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विधायक काम करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले जातात. डॉ. विलास डांगरे सेवाव्रती असून अनेक संस्था-संघटनांसोबत रुग्णांच्या सेवेत त्यांनी वाहून घेतले आहे. पत्रकार चंद्रकांत वानखडे हे शेतकऱ्यांचे व शेत मजुरांचे दु:ख समजून घेऊन त्यांच्या हक्कासाठी व हितासाठी चळवळ करणारे तसेच उत्कृष्ट लेखकही आहेत.
गांधीसागरजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात ११ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला महापौर अनिल सोले, आमदार विकास कुंभारे, शिवप्रिया समूहाचे संस्थापक दिलीप जाधव, शेतकरी नेते अमर हबीब, महापालिकेचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके याप्रसंगी उपस्थित राहतील. किशोर भागडे, प्रतिभा शिंदे व अरुणा सबाने यांचा निवड समितीत समावेश होता.