पावसाळ्याच्या अगोदर पनवेल नगर परिषदेने नालेसफाईची सर्व कामे केल्याचा दावा केला होता. मात्र शुक्रवारच्या पावसाने हा सर्व दावा फोल ठरविला. शिवाजी चौकातून रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या मार्गावर नाल्यातून तुंबलेले पाणी रस्त्यावर साचले होते. तसेच या पाण्यावर तरंगणारा कचरा पनवेल नगर परिषदेच्या नालेसफाईच्या कामाचा पुरावाच नागरिकांसमोर मांडला.
नगर परिषदेमध्ये आरोग्य विभागात संपर्क केल्यावर एकही अधिकारी नागरिकांच्या उत्तरासाठी येथे उपस्थित नव्हते. अधिकाऱ्यांना मोबाइलवरून संपर्क साधल्यावर अति पावसामुळे ही वेळ आल्याचे आरोग्य अधिकारी दिलीप कदम यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाच्या वेळी नगर परिषदेच्या वतीने मोठय़ा वल्गना करून यंदाच्या पावसाळ्यात नाले स्वच्छ केल्याने कोणतीही अडचण येणार नसल्याचा दावा केला होता. या दाव्याला राज्यकर्त्यांनीही दुजोरा दिला होता. नालेसफाई होताना आणि त्यावर राज्यकर्ते प्रशासनातील अधिकाऱ्यांचे असणारे लक्ष असे छायाचित्र काढण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र शुक्रवारच्या सतत चालणाऱ्या पावसाने पनवेलकरांना त्या मोहिमेची आठवण करून दिली.