रात्री दहाची वेळ. सीएसटीवरून निघालेल्या एका गाडीत महिलांच्या डब्यात एक तरुणी एकटीच होती. लोकल सॅण्डहर्स्ट रोडला थांबली. येथे तरी एखादी महिला चढेल ही आशा तिला असते. पण, तीची अपेक्षा काही पूर्ण होत नाही. लोकल पुन्हा सुरू होते. पण वेग घेण्याआधीच्या त्या काही क्षणांमध्ये खिडकीत बसलेल्या ‘तिच्या’बाबत असं काहीतरी घडतं की ते तिच्या स्मृतीतून कधीच पुसलं जाणार नाही. लोचट स्पर्श, अश्लील हावभाव किंवा बोलणं असं काहीच घडलेलं नसतं. फक्त असतो तो एका पुरुषानं उद्दामपणे आणि मुद्दाम टाकलेल्या थुंकीचा दर्प. तुच्छता, तिरस्कार, लोचटपणा, रासवटपणा आणि स्त्रीभोगी मानसिकता असं सारंसारं त्या एका थुंकीत जणू ओतप्रोत भरलेलं. चेहरा, कपडे, पर्स असं सगळंच त्यानं माखलेलं. हातात सापडला असता तर चप्पलेनं तुडव-तुम्डव तुडवला असता. पण, धावत्या लोकलमधून उतरणं शक्य नव्हतं आणि परत फिरावं तर तो सापडणं निव्वळ अशक्य होतं. रागाचा निचरा न झाल्यानंच बहुधा स्वच्छ पुसून, धुवून देखील जाणार नाही अशी ती घाण ‘ती’ मनात आजही वागवते आहे. इतकी की लोकलमध्ये खिडकीजवळ बसायलाही तिला भीती वाटते.
असाच एक अनुभव एका मध्यमवयीन स्त्रीचा! तिला एकानं असंच रात्रीच्या वेळी रेल्वेच्या भुयारी मार्गात ‘दाबलं’. ओझरतं असतं तर एकाददुसरी शिवी हासडून दुर्लक्ष करता आलं असतं. पण, आव्हान देणारा कोणीच नसल्याने ‘त्याने’ यथेच्छ संधी साधून घेतली. काय करावं ते लक्षात न आल्यानं तिथेच काही मिनिटं सुन्न अवस्थेत उभ्या राहिल्या. मागून येणाऱ्या कार्यालयातील सहकाऱ्यानं हलविलं तेव्हा कुठे भानावर आल्या. दोन तरूण मुलांची आई असलेल्या आपल्यासारख्या प्रौढेच्या वाटय़ालाही असा अनुभव येऊ शकतो, या विचारानं त्या आजही धास्तावतात.
हे असे अनुभव ‘देणाऱ्या’ व्यक्ती वेगवेगळ्या असल्या तरी यामागे वृत्ती एकच आहे, ‘पौरुषत्त्वा’ची. हे पौरुषत्त्व म्हणजे नेमकं काय? मानसोपचारतज्ज्ञांच्या मते याची सुरुवात पौगंडावस्थेपासून होते. साधारणपणे १९ ते २२व्या वयात होणाऱ्या हार्मोन्समधील बदलामुळे लैंगिक उत्तेजनाची भावना वाढीला लागते. पुरुषातील हे हार्मोन लैंगिकतेबरोबरच राग, चीड या भावनांची तीव्रताही ठरवित असतात. म्हणूनच कदाचित आचकट-विचकट बोलून, अंगविक्षेप करण्याबरोबच स्त्रीला शारीरिक इजा पोहोचवून किंवा थुंकण्यासारख्या गलिच्छ प्रकारांतून लैंगिक भावना व्यक्त केल्या जात असाव्या.
हार्मोनमधील बदल हे ठराविक वयात पुरुषांबरोबरच स्त्रीमध्येही होत असतात. पण, पुरुषांची लैंगिकता स्त्रीप्रधान समजली जाते. म्हणजे पुरुष एखाद्या स्त्रीच्या बाह्य़ रूपावर भाळून तिच्याकडे लगेचच आकर्षिला जाऊ शकतो. तरूण मुले विवाहितेकडे आकर्षित होतात ते याचमुळे. तुलनेत स्त्रीच्या मनात या भावना सहजासहजी येत नाहीत. मुली सहजा मैत्रिणींसमवेत वावरताना दिसतात. मुलांचे तसे नसते. शिवाय लैंगिक उत्तेजनाच्या या न कळत्या वयात लग्न वगैरे गोष्टीही शक्य नसतात. या भावनांचा कोंडमारा झाल्याने तरुणांमध्ये राग, चीड, त्रस्तता आदी भावना बळावतात. पॉर्न फिल्म किंवा अश्लील मासिके चाळून शारीरिक समाधान मिळत नाही. अशा वेळेस हस्तमैथुनासारख्या गोष्टीतून आपल्या भावनांचा निचरा करण्याचा मार्ग डॉ. राजन भोसले यांच्यासारखे सेक्सॉलॉजिस्ट सुचवितात.
‘लैंगिकतेच्या नैसर्गिक भावनांना वाट करून देणारे हे मार्ग नैसर्गिक आहेत. त्यामुळे, पालकांनीही यात काही गैर मानायचे कारण नाही,’ असे ते सांगतात.
अभ्यास, करिअरमध्ये वाहून घेऊन वा एखादी कला वा छंद जोपासून किंवा सामाजिक वा अन्य कार्यात स्वत:ला गुंतवून घेऊन मुलांना लैंगिकतेच्या भावनांना आवर घालता येतो. ‘संस्कारक्षम घरांमध्ये या प्रकारचे वातावरण असल्याने ते शक्य होते. मात्र, काही घरांमध्ये या प्रकारचे वातावरण नसल्याने टवाळक्या करण्याकडे वृत्ती फोफावते. यातून पुढे छेडछाडीचे प्रकार उद्भवतात. म्हणून मुलांनी आपल्याला इतर व आवडीच्या कामामध्ये गुंतवून घ्यावे,’ असे शुश्रुषा रुग्णालयात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या संगीता वझे सुचवितात.
हे झाले पौगंडावस्थेतील तरूणांचे. पण, मध्यमवयीन पुरुषांमध्येही जेव्हा या प्रकारच्या भावना आढळून येतात तेव्हा ते त्या त्या वयात लैंगिक भावनांचा निचरा न झाल्याचे लक्षण असते. ती एक विकृतीच असते. पण, आपल्याकडे लैंगिकतेविषयी बोलताना मुले कचरतात. काही घरांमध्ये मुली आईशी याबाबत संवाद साधतात. पण, अशी जवळीक मुलगा आणि वडिलांमध्ये नसते. लैंगिकतेविषयीच्या अज्ञानामुळे होणारी ही घालमेल मुले कुणाकडे सहजपणे व्यक्तही करू शकत नाहीत. मग या कोंडमाऱ्यातून त्यांच्या हातून छेडछाडीसारखे गैरवर्तन घडते. याला वेळीच आवर घालायचा असेल तर मुलांना न कळत्या वयातच लैंगिकतेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याशिवाय गत्यंतर नाही, असे संगीता वझे सुचवितात.
र. धों. कर्वे यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात लैंगिक शिक्षणाची झालेली परवड जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत इथल्या स्त्रियांच्या मनातील ‘ती’ घाण धुतली जाणे अशक्य आहे!