तालुक्यातील कैलासवाडी येथील प्राथमिक शाळा एकाच शिक्षकावर चालविली जात आहे. शाळेला कुलूप ठोकूनही प्रशासन दखल घेत नसल्याने मंगळवारी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.
कैलासवाडी येथे जि. प.ची पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा असून मागील एक वर्षांपासून एकाच शिक्षकावर चार वर्ग चालविले जात आहेत. ग्रामस्थांनी वारंवार या बाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देऊन लक्ष वेधले. मात्र, अजून शिक्षकांची नियुक्ती झाली नाही.
२५ जानेवारीपासून ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले तरीही शिक्षण विभागाला जाग आली नाही. अखेर एसएफआयच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव विनोद गोविंदवार यांच्यासह संजय पवार, गणेश लोखंडे, मंजुश्री कवाडे आदी उपस्थित होते.