News Flash

शहनाईचा ‘अपार सूर’

शहनाईसारख्या अवघड वाद्यातील सुरावट नजाकतीने मांडणारे कल्याण अपार हे मराठवाडय़ात या क्षेत्रातील तसे एकमेव नाव.. हे वाद्य दीड सप्तकातील. एखादा पट्टीचा वाजविणारा कलाकार तो

| December 21, 2013 01:55 am

पुणे येथे सवाई महोत्सवाची सुरुवात मंगलमयी सुरांनी झाली आणि औरंगाबादमधील संगीत क्षेत्रातील जाणकारांना कल्याण अपार हे नाव आठवले. मराठवाडय़ात वाद्यसंगीतात स्वतला झोकून देणारी तशी मोजकीच नावे. शहनाईसारख्या अवघड वाद्यातील सुरावट नजाकतीने मांडणारे कल्याण अपार हे मराठवाडय़ात या क्षेत्रातील तसे एकमेव नाव.. हे वाद्य दीड सप्तकातील. एखादा पट्टीचा वाजविणारा कलाकार तो पाऊण सप्तकात वाजवू शकतो. तोंडाने फुंकताना मनात उमटणारा स्वर वाद्यातून बाहेर निघावा, यासाठी लागणाऱ्या रियाजाची धाटणीही निराळीच. आजोबा, वडिलांकडून आलेला शहनाईचा वारसा कल्याणरावांनी २००५ मध्ये सवाईपर्यंत नेला, म्हणूनच सवाई सुरू झाला की अपार यांच्या मंगलमयी सुरांची आठवण औरंगाबादकरांना होतेच.
भोकरदन तालुक्यातील नालसावंगी हे कल्याण अपार यांचे मूळ गाव. आईचे वडील उस्ताद तोताराम हिवरे यांच्याकडून शहनाई अपार यांच्या घरात आली. त्या सुरांची जादू लहानपणापासून आकर्षति करीत होती. शहनाई वाजविण्याची देवनाळ पत्ती त्यांच्या ओठाला लागली, ती आजतागायत. शहनाईच्या रचनेत ओठाला चिकटविण्याचा जो स्वतंत्र चपटा भाग असतो, त्याला पत्ती म्हणतात. बनारसमध्ये ही पत्ती मिळते. श्वास व कलावंताचा दम या पत्तीवर ठरतो. या वाद्याचे कल्याण अपार यांना किती वेड? भारतरत्न बिस्मिल्ला खान यांची शहनाई बनविणाऱ्या बनारसमधील शफी खान नावाच्या कलाकाराकडून कल्याण अपार यांनी शहनाई बनवून घेतली.
खरे तर शहनाई वाजविण्याची महाराष्ट्राची धाटणी निराळी आणि बनारसी बाज निराळा. तो शिकण्यासाठी बरेच कष्ट घेतल्याचे कल्याणराव सांगतात. ते म्हणतात, हे वाद्य शिकायचे असेल तर शास्त्रीय संगीत शिकावेच लागते. मनात घोळणारा सूर वाद्यावाटे निघावा, यासाठी फुंक किती ठेवायची, याचा अंदाज घ्यावा लागतो. त्यामुळे हे सारे शिकण्याची प्रक्रिया आजही निरंतर सुरू आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य प्रभाकर भंडारी यांच्याकडे संगीत विशारदपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली. त्यानंतर यशवंतबुवा क्षीरसागर यांच्याकडे शिक्षण घेतले. आता सतारवादक पद्मश्री शाहीर परवेज यांच्याकडे शिकत आहे. गाणे शहनाईत उतरविणे तसे अवघड आहे. ते काम करतो आहे. किती जमेल कसे जमेल, याची पर्वा न करता मेहनत घेणे आपल्या हाती.
आकाशवाणीवरून येणारा शहनाईचा सूर आणि त्याचे शास्त्रीय वादन ऐकल्यावर जी मोजकीच नावे समोर येतात, त्यात मराठवाडय़ातून पुढे येणारे एकमेव नाव त्यांचेच असते. संगीत मैफलीत ते चच्रेत असतात.
या वाद्यासाठी प्राणायाम, योगाभ्यास आवश्यक असतो. दमसास टिकवायचा असेल तर हा रियाजही रोज व्हावाच लागतो. शहरातील बळीराम पाटील शाळेच्या बाजूने गेल्यावर हडको परिसरातील अनेकांना शहनाईचे हे सूर ओळखीचे झाले आहेत. कारण तेवढा रियाज ते करतातच. वडील ओंकार अपार प्रसिद्ध संगीतकार शंकरराव गायकवाड यांच्याकडे हे वाद्य शिकले. ते पट्टीचे वाजविणारे होते. त्यांचा वारसा पुढे नेताना प्रयत्न करणारे कल्याणराव पशाअडक्याचा फारसा विचार करीत नाहीत. ही कला वाढवायची, एवढाच त्यांचा ध्यास. सवाईच्या निमित्ताने त्यांचे मंगलमयी सूर अनेकांना आठवून गेले. मराठवाडय़ातील वाद्य संगीतामधील हा अपार सूर थेट भिडतो, हे मात्र नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 1:55 am

Web Title: shahanai music face of debate kalyan apar aurangabad
टॅग : Aurangabad
Next Stories
1 जांभळी मिरची, बदकफूल, संगीतावर डोलणारे झाड..
2 नाशिकमध्ये नवीन किकवी धरणाच्या निर्मितीला आक्षेप
3 महावितरण, बांधकाम विभागाच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचे ‘रास्ता रोको’
Just Now!
X