मराठवाडय़ाच्या मातीला नाटय़ चळवळीचा मोठा देदीप्यमान वारसा लाभला. नाटकाचा ध्यास आणि श्वास हाच या मातीचा गुण बनला. नाटकाचे वेड अंगी भिनल्यानेच आज चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरेंसारखी तरुणांची फौज नाटय़-चित्रपट क्षेत्रात मुक्त मुशाफिरी करीत आहेत. या व अशाच रंगकर्मीना मान-सन्मान मिळवून देणाऱ्यांमध्ये वामन केंद्रेंसारख्यांचे नाव आज मोठय़ा आत्मीयतेने व गौरवाने घेतले जाते.. नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासारख्या राष्ट्रीय संस्थेच्या संचालकपदाची धुरा केंद्रे यांच्यावर सोपविण्यात आली. या नव्या जबाबदारीमुळे केंद्रे यांच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला गेला आहे.
लहानपणी मिळालेल्या शाबासकीने नाटकाची गोडी मनावर खोलवर रुजली, ती कायमची. नाटकासाठी डोक्यात प्लॉट घेऊन पडेल ते काम करत वामन केंद्रे यांनी ३ वर्षांपूर्वी नाटक शिकण्यास दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या (एनएसडी) संस्थेच्या संचालकपदी केंद्रे यांची नुकतीच निवड झाली. पारंपरिक प्रथा, कला, लोककला, नाटकांतून आधुनिक पद्धतीने सादरीकरण करून नाटय़ क्षेत्रात ”नवे पर्व” सुरू करणाऱ्या केंद्रे यांनी कलावंतांच्याही पिढय़ा घडवल्या. विद्यार्थी ते संस्थेचे प्रमुख हा नाटय़ प्रवास गुणवत्ता व कठोर परिश्रमाचे फलित ठरला. त्यांची निवड या क्षेत्रात धडपडणाऱ्यांसाठी प्रकाशवाट ठरली आहे.
जिल्हय़ातील दरडवाडी (तालुका केज) या आडवळणाच्या केवळ पन्नास उंबरांच्या गावातील माधवराव व मुक्ताबाई केंद्रे या शेतकरी दाम्पत्याचा वामन हा मुलगा. कोरडवाहू शेतीवरच कुटुंबाची उपजीविका. घरात वारकरी परंपरा, पूर्वजांकडून आलेल्या भजन, ओव्या व भारुडांचा वारसा. माधवराव यांचा शेतीनंतर भारुड हा आत्मा. ते भारुडासाठी अनेक ठिकाणी जात. भारुडाचे सादरीकरण अप्रतिम असे. ग्रामीण लोककला, परंपरा, श्रद्धा यांचा साहजिकच लहानपणी वामनरावांवर संस्कार होत गेला. शाळेसाठी ५ किलोमीटर बाभळगावला पायपीट होई. याच गावात जत्रेत हरहुन्नरी वामन यांनी पहिल्यांदा नाटक सादर केल्याने शाबासकी मिळाली. लहानपणी नाटकामुळे शाबासकी मिळाल्याने मनात नाटकाची आवड खोलवर रुजली, ती कायमची. सातवीपर्यंत नेकनूर येथून शालेय शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी बीडच्या नवगण महाविद्यालयात दाखल झाले. या काळात डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचा मोठा प्रभाव होता. या चळवळीत केंद्रेही ओढले गेले. त्यावेळी श्रीराम बडे यांची भेट  झाली. दोघांनाही नाटकाची आवड. महाविद्यालय स्नेहसंमेलन व विविध कार्यक्रमांतून त्यांची नाटके रंगू, गाजू लागली. नाटकाचे वेड लागल्याने ज्येष्ठ नाटककारांबरोबर डोक्यावर प्लॅट घेऊन हे तरुण नाटय़वेडे पडेल ते काम करीत.
शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात एक दिवस नाटक करण्याची संधी मिळाली आणि त्या रात्रीतून वामन केंद्रे त्या काळात ‘स्टार’ बनले. डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांशी जोडले गेलेल्या वामन केंद्रे यांना इतर कोणत्याही व्यासपीठापेक्षा नाटकाच्या व्यासपीठावरून आपली भूमिका सक्षम आणि मोकळेपणाने मांडता येते, हे लक्षात आल्याने त्यांनी नाटकातच करीअर करण्याची खूणगाठ बांधली. त्यातूनच देशातील सर्वोच्च नाटय़ प्रशिक्षण संस्था असलेल्या दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पहिल्या प्रयत्नात यश न आल्यामुळे औरंगाबाद येथे विद्यापीठात एक वर्ष नाटय़ प्रशिक्षण घेऊन त्यांनी ‘एनएसडी’ त प्रवेश मिळवला. पायजमा, नेहरू शर्ट व काखेत शबनम पिशवी अशा पेहरावात अत्यंत ग्रामीण भागातून गेलेल्या केंद्रे यांना मराठी लोककलांची विलक्षण जाण होती. प्रशिक्षण काळात याच माहितीचा वापर करून आधुनिक पध्दतीने नाटकांचे सादरीकरण केल्याने संस्थेचे लक्ष त्यांच्याकडे वळले. त्यातून केरळच्या लोककलांचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. प्रशिक्षण पूर्ण करून मुंबईत आलेल्या केंद्रे यांनी नाटय़ परिषद शिबिराचे अनेक वर्षे संचलन केले. याच काळात ए. के. हंगल व नारायण सुर्वे यांनी डबघाईला आलेल्या इप्टा या नाटय़संस्थेचे नेतृत्व वामन केंद्रे यांच्याकडे दिले. या संस्थेच्या माध्यमातून झुलवा हे पहिले नाटक रंगमंचावर आले. या नाटकाने पुढे इतिहास निर्माण केला. मराठी माणसाच्या पारंपरिक प्रथा, श्रद्धा आधुनिकपणे मांडणारा हा प्रयोग यशस्वी झाला.
सुसंस्कृत नाटककार भास लिखित ‘मध्यम व्यायोग’ हे नाटक याचे मराठी रूपांतर आणि रणांगण, मोहनदास, जानेमन ही नाटके आधुनिक पद्धतीने सादर करून केंद्रे यांनी नाटय़ दिग्दर्शनाची संकल्पनाच बदलून टाकली. प्रयोगशिलता हा केंद्रेंचा स्थायिभाव त्यामुळे इप्टाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नाटय़कलावंत जोडले. मुंबईत जम बसल्यानंतर ”विद्यापीठ” ही नाटय़संस्था स्थापन करून प्रिया बावरी, मोहे पिया आणि ओ माय लव्ह या नाटकांचा त्रिभाषिक प्रयोग एकाच कलावंतांच्या संचात मुंबईतील वेगवेगळया नाटय़गृहात सादर करून गर्दीचे उच्चांक मोडले. मुंबई विद्यापीठात स्वतंत्र नाटय़शास्त्र विद्य्ोची ‘अॅकॅडमी ऑफ थेटर आर्ट’ ची सुरुवात केली. या शाखेची मांडणी, अभ्यासक्रम, स्वरूप हे केंद्रे यांच्या कल्पनेतून साकारले. मागील दहा वर्षांपासून या शाखेची धुरा ते सांभाळत आहेत. या शाखेने अनेक कलावंत निर्माण केले. केंद्रे यांनी अनेक कलावंतांच्या पिढय़ाच घडवल्या. त्यांची पत्नी गौरी केंद्रे याही कलावंत असून त्यांची सध्या दूरचित्रवाहिनीवरील देवयानी या मालिकेतून काम करीत आहेत.
देशातील प्रमुख दिग्दर्शकांपैकी एक असा लौकिक मिळवलेल्या केंद्रे यांना कायम गावच्या मातीची ओढ असते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी दरवाडी येथे माधवराव केंद्रे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय भारुड महोत्सव सुरू केला. माणसं मोठी झाली की गाव विसरतात, पण केंद्रे यांची गावाकडची ओढ कायम आहे. आई, वडील निरक्षर, कोणतीही नाटय़कलेची परंपरा नसताना वामन केंद्रे यांनी अत्यंत कठीण परिश्रमातून यश मिळवलं आहे. स्वतकडे गुणवत्ता असेल, प्रामाणिकपणे काम करण्याची तळमळ आणि नावीन्याचा वेध व कामाचा ध्यास असलेला माणूस प्रतिकूल परिस्थितीतूनही कोणत्याही क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवू शकतो, हेच सिध्द होते. तीस वर्षांंपूर्वी ज्या संस्थेत धडपड करून प्रवेश मिळवला. त्याच संस्थेच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाली, हे फार कमी लोकांना साध्य होते. त्यापकी वामन केंद्रे हे एक ठरले आहेत. त्यांच्या निवडीने पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या एनएसडीच्या संचालकपदी मराठी माणसाची निवड झाली आहे. त्याहीपेक्षा सध्याही रस्ता नसलेल्या दरडवाडीत जन्मलेल्या वामन केंद्रे यांची निवड धडपडणाऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे.