विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे कानी पडताच आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला. कारण मी कधीही हा विचार केला नव्हता. महत्त्वाकांक्षा माझ्या स्वाभावात नसल्याने मी जे मिळाले, त्यात समाधान मानून पुढे आलो. मी यवतमाळ जिल्ह्य़ातील बोरी अरबसारख्या छोटय़ा गावातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. आतापर्यंत संमेलनाचे जे अध्यक्ष झाले ते अभ्यासक. त्यांचे वाचनही दांडगे. मी आपला कवी तेही बोलीचा. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे अभ्यासू भाषण देता येणार नाही, असे संमेलनाध्यक्ष वऱ्हाडी कवी शंकर बढे सांगताच उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांनी अभिनंदन केले.
आर्णी येथे ६३ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे शुक्रवारी थाटात उद्घाटन झाले. सर्वप्रथम सकाळी ११ वाजता शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. सर्वधर्म समभाव दृढ होण्याच्या दृष्टीने सर्व शाळांनी ग्रंथिदडीत भाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देखाव्यांनी आर्णीकरांचे लक्ष वेधून घेतले. संमेलनाचे अधक्ष शंकर बढे, राज्याचे सामाजिकन्यायमंत्री शिवाजीराव मोघे, डॉ. संजय भारती, नगराध्यक्ष अनिल आडे, पालिका उपाध्यक्ष आरिजबेग यांनी तीर्थरूप मंगल कार्यालयात दोन किलोमीटर पायी चालत ग्रंथिदडी आणली. त्यानंतर राज्याचे सांकृतिक मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष वऱ्हाडी कवी शंकर बढे, स्वागताध्यक्ष शिवाजीराव मोघे, विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार, संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. किशोर सानप, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कवी विठ्ठल वाघ, कलीम खान, वामन तेलंग, डॉ. रमाकांत कोलते, सुभदा फडणवीस, दिलीप एडतकर आदी उपस्थित होते. विदर्भ साहित्य संमेलनाचे संयोजक आरिजबेग यांनी विदर्भ साहित्य संमेलनाचे महत्त्व स्पष्ट केले. स्वागताध्यक्ष मोघे यांनी पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
साहित्यामध्ये शक्ती असल्याने तरुणांमध्ये परिवर्तन करण्याची जिद्द साहित्यिकांनी निर्माण करावी, असे संजय देवतळे यांनी उद्घाटनप्रसंगी म्हणाले. पर्वितन घडविण्याची शक्ती केवळ लेखनीमध्ये असून लेखकांनी व साहित्यकांनी आता समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्वागताध्यक्ष मोघे म्हणाले.
साहित्य ही कला आहे. उपासनेशिवाय साध्य होत नाही. शब्द हे साहित्याचे वाहन आहे. त्यामुळे साहित्याला जपण्याची खरी गरज आहे, असे विचार सुरेश व्दादशीवार यांनी व्यक्त केले.
संमेलनाचे संचालन ज्योती तोटेवार यांनी केले.