स्वागतासाठी  पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या बैठका सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तब्बल चार वर्षांनंतर नागपुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या बैठका सुरू असतानाच पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आम्हाला डावलले जात असल्याचे सांगून नाराजी व्यक्त केल्याने राष्ट्रवादीत मानापमान नाटय़ रंगणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे तसेच काँग्रेससोबत युती केल्याने अनेक ठिकाणी पक्षाला फारसे यश आले नाही. विशेषत ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त फटका बसला आहे. दोन्ही निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्यात आल्यानंतर ग्रामीण भागात सदानंद निमकर यांच्याविषयी असलेली नाराजी बघता त्या भागात पक्षनेतृत्व बदलण्यात आले. शहरामध्ये अशीच परिस्थती होती. दिलीप पुनकुले, वेदप्रकाश आर्य यांच्यासह अनेक नेत्यांनी शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्याविरुद्ध बंड पुकारून आरोप-प्रत्यारोप केले, मात्र पक्ष नेतृत्त्वाने अजय पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून त्यांना पुन्हा एकदा अध्यक्ष केले. त्यातही ग्रामीण आणि शहर असा वेगळा वाद गेल्या काही दिवसात समोर आला आहे. त्यावर अधिकृपतपणे कोणी बोलत नाही, मात्र खासगीत अनेकजण नाराजी व्यक्त करीत आहेत.
शरद पवार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री १७ सप्टेंबरला शहरात येत असताना त्यांच्या स्वागताची तयारी करण्याच्या उद्देशाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री रमेश बंग यांच्या उपस्थितीत नुकतीच पक्षाच्या कार्यालयात ग्रामीण आणि शहर अशा दोन्ही विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. शहराच्या पदाधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून ते प्रसार माध्यमांकडे पाठविले. त्यात केवळ शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नावे असून ग्रामीण अध्यक्षांना मात्र डावलण्यात आले आहे.
पक्षाचे मंत्री किंवा पदाधिकारी नागपुरात आले की त्यांच्या अवतीभोवती शहरातील पदाधिकाऱ्यांचा वावर असतो त्यामुळे अनेकदा ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होतात आणि तशी नाराजी अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाजवळ बोलून दाखविली आहे. गणेशपेठमध्ये पक्षाचे मुख्य कार्यालय असून त्या कार्यालयात ग्रामीण आणि शहर अशी दोन वेगवेगळे कार्यालये आहेत. पक्षाचे मंत्री किंवा पदाधिकारी नागपुरात आले की शहरातील पदाधिकारी प्रथम आपल्या कार्यालयात त्यांना घेऊन जात असतात. त्या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून पत्रकार परिषद आटोपून घेतात आणि आपलीच नावे प्रकाशित करून घेतात, असेही ग्रामीण कायकर्ते बोलू लागले आहेत. सदानंद निमकर यांच्यानंतर ग्रामीणची धुरा बंडू उमरकर यांच्या खांद्यावर देण्यात आली असली तरी जिल्हा आणि ग्रामीण अशी एकत्र बैठक  आयोजित केली की त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे ग्रामीणचे पदाधिकारी बोलू लागले आहेत.
दुसरीकडे अजय पाटील यांच्या नेतृत्वाला पक्षाच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतरही पुन्हा त्यांच्या हातात शहराचे नेतृत्व दिले. पाटील यांनी काही जवळच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन शहराच्या कार्यकारिणीवर वर्चस्व निर्माण केले, त्यामुळे काही आजी-माजी पदाधिकारी त्यांच्यावर नाराज आहेत. ही नाराजी आणि मानापमानाचे नाटय़ शरद पवार यांच्या आगमानानिमित्त पुन्हा समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.