राज्याचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री ते उपपंतप्रधान असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची ओळख एक ‘सुसंस्कृत राजकारणी’ अशी ही आहे. ज्या गावाने यशवंतरावांचे व्यक्तिमत्व घडविले त्या ‘देवराष्ट्र’या त्यांच्या जन्मगावचे त्यांचे घराचे आता स्मारक होणार आहे. ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’च्या प्रयत्नातून आणि राज्य पुरातत्व विभागाच्या सहकार्याने हे स्मारक साकारले आहे. वास्तुविशारद विजय गजबर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या स्मारकाचे उद्घाटन २६ जून रोजी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
चव्हाण यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात देवराष्ट्रचा सविस्तर उल्लेख आहे. पूर्वी सातारा जिल्’ाात असलेले हे जन्मगाव आता सांगली जिल्’ाात आणि कडेगाव तालुक्यात येते. देवराष्ट्र हे चव्हाण यांचे हे जन्मगाव  असून तेथे त्यांचे मूळ घर आजही उभे आहे. सहा छोटय़ा खोल्या आणि मध्ये अंगण असे त्याचे स्वरूप आहे.    
राज्य शासनाच्या ‘वैभव संगोपन’ या योजनेअंतर्गत हे घर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला पाच वर्षांसाठी संगोपन आणि देखभालीसाठी देण्यात आले आहे. या निवासस्थानी हे स्मारक उभारले जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी सांगितले.
यशवंतरावांचे छोटे पुतळे, त्यांच्या वापरातील वस्तू, संग्रहातील तसेच त्यांनी लिहिलेली पुस्तके एका खोलीत मांडण्यात येणार आहेत. यशवंतरावांच्या महत्त्वाच्या भाषणांची झलक ध्वनिफितीच्या माध्यमातून तेथे ऐकता येणार आहे. एक दालन फक्त त्यांच्या छायाचित्रांचे असून यात बालपण ते १९४६, १९४६ ते १९६२ आणि पुढे १९८४ पर्यंतच्या काळातील महत्त्वाचे प्रसंग, घटना यांचा समावेश आहे.
स्मारकाचे वास्तुविशारद विजय गजबर यांनी सांगितले की, चव्हाण यांचे हे मूळ घर ‘राज्य संरक्षित वास्तू’मध्ये येते. पुरातत्व विभागाने तेथे यापूर्वी काही डागडुजी केलेली आहे. मूळ वास्तूला धक्का न पोहोचविता आम्ही त्यात काही सुधारणा केल्या आहेत. तेव्हाचे स्वयंपाकघर, भांडीकुंडी, चूल हे ही तेथे उभारले आहे. हे स्मारक पाहताना आपण तेव्हाचे घर पाहतो आहोत, असा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.