राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार येत्या रविवारी (दि. २४) आपल्या माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी खटाव-माण तालुक्याच्या दौ-यावर येत आहेत. लोकसभा व त्यानंतर येणा-या विधानसभा निवडणुकांच्या चाचपणीसाठी ते दौ-यावर येत असून, पवारांनी स्वत: लढणार नसल्याचे जाहीर केल्याने माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर, विजयसिंह मोहिते-पाटील व रामराजे निंबाळकर हे नाराज नेते इच्छुक असल्याने पवारांच्या खटाव, माण दौ-याकडे फलटण व अकलूजकरांच्या नजरा लागून राहणार आहेत.
शरद पवार रविवारी सकाळी ९ वाजता म्हसवड येथे येणार आहेत. साडेनऊ ते पावणे दहा राऊतवाडी व म्हसवड येथील जिहे-कठापूर योजनेंतर्गत बांधलेल्या बंधा-याचे ते उद्घाटन करणार आहेत. यानंतर त्यांचे पानवण येथे आगमन होणार आहे. येथे साखळी सिमेंट बंधारे पाहणी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता व शेतक-यांच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करतील. पुढे विरळी येथे आपल्या फंडातून बांधलेल्या साखळी सिमेंट बंधा-यांचे शरद पवार उद्घाटन करणार आहेत. दुपारी चितळी (ता. खटाव) येथील विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, जिल्हा बँकेच्या स्थलांतरित शाखेचा शुभारंभ व येरळा नदीवरील बंधा-याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर मायणी येथे थेट भेट देऊन खंडाळा तालुक्याकडे ते प्रयाण करणार आहेत.