राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीच्या राजकारणाने नव्हे, तर समाजकारणाच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे. कोणाकडूनही जाती-पातीमध्ये दुरावा निर्माण करण्याचे काम होता कामा नये, असा सज्जड इशारा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला. आमची जात बळीराजाची, कष्टक ऱ्यांची आणि कामात इमान राखणाऱ्यांची असून आपसात दुरावा निर्माण करणाऱ्यांची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जाती-पातीच्या राजकारणाची आपल्या खास शैलीत खिल्ली उडवित पवार यांनी तसा प्रयत्न करणाऱ्यांचे कान टोचले.
शुक्रवारी सकाळी येवला तालुक्यातील मोहन गुंजाळ ट्रॅफिक पार्क, ग्रामीण पर्यटन केंद्र यांचे उद्घाटन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण, महात्मा फुले नाटय़गृहाचे उद्घाटन आणि पैठणी क्लस्टरचे भूमीपूजन पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ, खा. समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, आ. जयंत जाधव, नगराध्यक्ष नीलेश पटेल हे यावेळी उपस्थित होते. पवार यांच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील माजी आमदार मारोतराव पवार, म्हाडाचे विभागीय सभापती नरेंद्र दराडे, अंबादास बनकर, माणिकराव शिंदे हे नेते प्रदीर्घ कालावधीनंतर एका व्यासपीठावर एकत्र आल्याचे पहावयास मिळाले.
नाशिकमधील काँग्रेसच्या एका नगरसेवकाने प्रसिध्द केलेल्या जाहीर निवेदनाचा संदर्भ घेत पवार यांनी जाती-पातीच्या राजकारणावर भाष्य केले. संबंधितांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्याची मागणी केली होती. आम्ही असे करू, तसे करू अशी भाषा वापरणे योग्य नाही. वेगवेगळे संदर्भ देऊन ही जागा आम्हाला द्या, अशीही मागणी कोणी करू नये, असे आवाहन पवार
यांनी केले.
येवलेकरांनी जनार्दन पाटील या अल्पसंख्याक नेत्याला आमदार केले तसेच अल्पसंख्याकांनी मारोतराव पवारांनाही आमदार केल्याचा दाखला पवार यांनी दिला. काही वर्षांपूर्वी देशाला गहू आयात करावा लागला होता. परंतु आज देश अन्न-धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. उलट कृषी निर्यातीतून १८७ हजार कोटी रूपयांचे परकीय चलन शेतकऱ्यांनी देशाला मिळवून
दिले. देशाची गरज भागवून गहू, तांदूळ, कापूस गाठी, साखर निर्यात केली जात असल्याचे पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राकडून सवलत दिली जाईल. यंदा राज्याला दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे ठिंबक सिंचनचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. त्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राकडून ४० टक्के आणि राज्य शासन २० टक्के असे ६० टक्के अनुदान देण्याची योजना राबविण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. येवला तालुक्याचा समतोल विकास झाला असला तरी शैक्षणिक दालन खुले होण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी पवार यांनी आपल्या माढा मतदार संघात केलेल्या कामाचीही माहिती दिली.  
छगन भुजबळ यांनी पक्षाने येवला तालुक्यात काम करण्याची संधी दिली आणि येवलेकरांनी आपल्याला भरभरून प्रेम दिल्याचे सांगितले. प्रास्तविकात भुजबळांना पुन्हा येवला मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली असता पवार यांनी सर्वाना विचारात घेऊन त्याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.