News Flash

शरद पवारांचा मतदारसंघ होरपळतोय

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जिल्हय़ातील आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातील माण तालुका दुष्काळात अक्षरश: होरपळून निघतो आहे. पाठोपाठ शेजारील खटाव तालुक्यातही

| April 3, 2013 01:25 am

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जिल्हय़ातील आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातील माण तालुका दुष्काळात अक्षरश: होरपळून निघतो आहे. पाठोपाठ शेजारील खटाव तालुक्यातही दुष्काळाचा वणवा कायम आहे. अपवाद वगळता या दोन्ही तालुक्यांत प्यायला हक्काचे पाणीही नसल्याने येथील जनता पुरती हवालदिल आहे. मात्र, प्राप्त परिस्थितीवर नियोजनबद्ध आणि प्रभावी कृती नसल्याने कायम हक्काच्या पाण्यासाठी काय हा कळीचा मुद्दा नेहमीप्रमाणेच ऐरणीवर राहतो आहे.  
सातारा जिल्हय़ात सर्वाधिक अन् भीषण पाणीटंचाई असलेल्या माण तालुक्याची लोकसंख्या सुमारे २ लाख असून, पैकी १ लाख ४० हजारावर जनतेला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या ८१ गावे व ३७७ वाडय़ावस्त्यांना १११ टँकरने दररोज पाण्याच्या ३७१ खेपा मंजूर आहेत. ५६ चारा छावण्यांमध्ये ४८ हजार ६९६ लहान, मोठे पशुधन निवारा घेऊन आहे. माणपाठोपाठ खटाव तालुक्याची परिस्थितीही बिकट असून, पुसेसावळी महसूल मंडल वगळता उर्वरित वडूज, कातरखटाव, मायणी, निमसोड, खटाव, पुसेगाव, बुध, औंध अशा आठही सर्कलमध्ये पाण्याची दाहकता आहे. या विभागांमध्ये ४२ छावण्यांमध्ये ३५ हजार ६०५ पशुधन निवारा घेऊन आहे. ९१ गावे व २०१ वाडय़ावस्त्यांना ११९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
मूळच्या दुष्काळातच अत्यल्प पावसामुळे पाण्याची दाहकता कमालीची राहिल्याने या दोन्ही तालुक्यांना शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण तसेच केंद्रीय पथकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेटी देऊन पाहणी करताना मदतीची भूमिका घेतली आहे. जलसंधारणाची सर्व कामे पूर्णत्वास जावीत अशा पद्धतीचे नियोजन समोर येत आहे. दरम्यान, निधींची मंजुरी आणि पाणी अडवण्यासाठी खटाटोप सुरू असून, सिमेट बंधारे, नालाबंडिंग अशी कामे सुरू आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी ४ ते ५ मीटरने खालावल्याने पाण्याचे सर्वच स्रोत कोरडे ठणठणीत आहेत. शासनाची मदत आणि घोषणांचा पाऊस पडला असला तरी एवढेच पुरेसे राहणार नाही तर लोकसहभागातून वृक्षलागवड, पाणी साक्षरता, थेंब थेंब अडवा आणि जिरवा, शेतीसाठी ठिबक सिंचनच तसेच पाण्याचा काटकसरीने वापर याबाबी गांभीर्याने घेतल्यास या दुष्काळी भागाला हिरवाई मिळणे शक्य होईल असा जाणकारांचा व्होरा आहे. दुष्काळाचे चित्र बदलण्यासाठी जलसंधारणातून सक्षम झालेले माण तालुक्यातील लोधवडे व खटाव तालुक्यातील निढळ या गावांचा आदर्श घेणे हिताचे ठरेल.
सातारा जिल्हय़ातील सर्वात मोठय़ा कराड तालुक्यात टंचाईची दाहकता नसली तरी पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीच्या उत्पादनात ३० ते ३५ टक्क्याने घट झाली आहे. किवळ या एकमेव व प्रतिष्ठित गावामध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बीचे उत्पादन अपेक्षित झालेले नाही. परंतु उसाच्या उत्पादनात १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे ऊसगाळप तुलनेत अधिक काळ सुरू राहणार आहे. शेतकरी पाणी व्यवस्थापन गांभीर्याने घेत असल्याने त्याचा उसासह इतर पिकांना चांगला फायदा होत असल्याचा विश्वास तालुका कृषी कार्यालयाने व्यक्त केला आहे. दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळख असलेल्या पाटण तालुक्यात यंदा कुठेही टँकरने पाणीपुरवठा नाही, मात्र रब्बी पिकाच्या उत्पादनात घट आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:25 am

Web Title: sharad pawars constituency faces severe drought
Next Stories
1 कर्जाची परतफेड करूनही वसुलीसाठी त्रास देणारा सावकार अटकेत
2 कोल्हापुरात अतिक्रमणांवर हातोडा
3 दुष्काळावर कायमस्वरूपी उपायाचा ‘लोकमंगल’ बंधारा…
Just Now!
X