News Flash

पवारांच्या विदर्भ दौऱ्याचे फलित शून्य

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यातून शेतक ऱ्यांना

| September 18, 2013 09:30 am

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यातून शेतक ऱ्यांना मदत मिळण्याची आशा फोल ठरली आहे. उलट त्यांच्या दौऱ्यामुळे शेतक ऱ्यांच्या नैराश्येत भरच पडली असून पवारांच्या दौऱ्याचे फलित शून्य आहे, अशी प्रतिक्रिया विदर्भातील शेतकरी नेत्यांनी व्यक्त केली.
पवारांनी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्य़ाचा दौरा केला. पवार यवतमाळवरून पिंपळखुटीला गेले आणि तेथून नागपूरला रवाना झाले. या मार्गात त्यांनी ज्या भागाला भेट दिली त्या ठिकाणी दशकभरात प्रत्येका गावात दहाच्यावर शेतक ऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादकांचा लागवड खर्चही दुपटीने वाढलेला आहे, पण हमीभाव मात्र वाढलेला नाही. पीक कर्जासाठी बँकांची दारेही बंद झालेली आहेत. अशा स्थितीत पवार पांढरकवडा येथील भेटीत पीक चांगले आहे, यावर्षी कापसाचे विक्रमी उत्पादन होईल, निर्यातीवर दोन टक्के कर लावू, असे सांगतात. पीक कर्जाबाबतही ते काहीही बोलले नाहीत. कापसाला हमी भाव वाढवून देतील, अशी अपेक्षा  होती, पण शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. सहकारी बँकेच्या पुनर्वसनाबाबतही पवार काहीही बोलले नाहीत. त्यांच्या दौऱ्याने शेतक ऱ्यांच्या नैराश्येत भर पडली आहे, अशी प्रतिक्रिया विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी स्वत:हा विदर्भात येऊन परिस्थिती बघावी, कापसाला हमीभाव वाढवून द्यावा, अतिवृष्टीमुळे संपूर्ण उद्ध्वस्त झालेले असताना सरकारकडून वेळेवर मदत मिळत नसल्याने शेतकऱ्ऱ्यांच्या आत्महत्या आणखी वाढतील, अशी भीतीही तिवारींनी व्यक्त केली.
केंद्र सरकार राज्य सरकारला १८८० कोटी रुपये जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत पवारांच्या या दौऱ्याचे फलित शून्य आहे, अशा शब्दात शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी शेतकरी संघटनेने सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने मदतीची घोषणाही केली, शासकीय आदेशही निघाला, परंतु शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही. पश्चिम विदर्भात आत्महत्या होत  आहेत, आता तशी वेळ पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांवरही आली आली आहे. रब्बी हंगाम सुरू होत आहे तरीही खरीप हंगामात झालेल्या नुकसानीबद्दल मदत मिळालेली नाही. केंद्र सरकारने तातडीने राज्य सरकारला मदत पाठवावी, अशी मागणी त्यांनी केली.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विदर्भाचा दोन दिवसांचा धावता दौरा करून विधानसभेत पॅकेजची घोषणा केली, परंतु त्यातील एक रुपयाही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकरी अजूनही वाऱ्यावरच आहेत. अतिवृष्टीनंतर दोन महिन्याने कृषीमंत्री पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आले, त्याआधी केंद्रीय पथक येऊन गेले. आणखी उच्चस्तरीय पथक येणार आहे. त्यानंतर  केंद्र सरकार राज्य सरकारला मदत पाठवेल, असे पवारांनी या दौऱ्यात सांगितले. मदतीसाठी हालाव्या लागत असलेल्या हलपाटय़ामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. सरकार मदत देण्यास विलंब करीत असून पवारांच्या दौऱ्यानेही काहीही लाभ झालेले नाही, उटल त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे शेतकरी नेते राम नेवले म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2013 9:30 am

Web Title: sharad pawars visit to vidarbha disappointing to farmers
Next Stories
1 परीक्षा नियंत्रकांची सेवा समाप्त होणार!
2 विघ्नहर्त्यांला आज निरोप ..
3 विसर्जन मिरवणुकांसाठीचे मार्ग निश्चित
Just Now!
X