तंबोऱ्याचा षड्ज मनाचा ठाव घेणारा. प्रचंड कोलाहलातून गेलेल्या व्यक्तीला क्षणाधार्थ एकाग्र होण्यास बाध्य करणारा. मोजकीच दर्दी मंडळी आणि एक विचार समग्र देश बांधणारा, तो म्हणजे संगीत. शारंगदेव महोत्सवाला शुक्रवारी सुरुवात झाली ती केरळातील सोपान संगीत व संगीत रत्नाकरमधील साम्यस्थळे सांगत..
आतला आणि बाहेरचा आवाज एकात्म करणारा नादब्रह्म ज्या शारंगदेवांनी सांगितला, त्यांच्या अभ्यासाचे संशोधन मांडताना भारतीय नृत्यपरंपरांचे समीक्षण करणाऱ्या लीला व्यंकटरमण म्हणाल्या, देश बांधला तो राजे-राजवडय़ांनी नव्हे. राजकीय व्यक्तीकडे एकात्म भाव निर्माण करणारा धागा नाही. तो पूर्वीदेखील नव्हता. तो आहे, संगीतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जाण्यास विमान नव्हते, तेव्हाही एकात्म भावना निर्माण करणारी शक्ती या प्रदेशात होती, ती शक्ती म्हणजे ‘संगीत’.
शारंगदेव महोत्सवास शुक्रवारी ‘महागामी’तर्फे एमजीएममध्ये उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटनानंतर शारंगदेव यांच्या संगीत रत्नाकर ग्रंथातील साम्यस्थळे यावर दीप्ती भल्ला यांचे व्याख्यान झाले. तत्पूर्वी या क्षेत्रातील समीक्षण करणाऱ्या लीला व्यकंटरमण यांनी विषयाची मांडणी केली. नृत्य, नाटय़ नि गायन म्हणजे संगीत अशी व्याख्या असली, तरी त्याचे अंग-उपांग याचा अभ्यास करताना नाटय़ येते. अभिनय येतो. कायावाचेची एक अभिव्यक्ती असते. ती म्हणजे संगीत रत्नाकर. एखाद्या सेनापतीलाही समजू शकते. वेगवेगळ्या व्यवसायात असणारे, वेगळ्या शिस्तीत वाढणारे लोक या क्षेत्रात येतात. सहभाग नोंदवितात त्यामुळेही हे क्षेत्र एकात्म बनले, असे सांगत त्यांनी भारत घडविण्यात संगीताचे योगदान किती आणि कसे हे त्यांनी सांगितले.
केरळमधील सोपान संगीत व संगीत रत्नाकर यांच्यातील भेद आणि साम्यस्थळे त्यांनी सांगितली. आता मूळ स्वर षड्ज असे जे गृहितक असे किंवा तोच सूर गृहस्वर म्हणून पुढे स्वररचना होते. मात्र, भावविश्व निर्माण करण्यासाठी अन्य स्वर पुरेसे असतील तर तेवढी अभिव्यक्ती केरळमधील मंदिर संगीतात होते. नृत्यांमधील मूलभूत फरकही त्यांनी सांगितले. आठव्या शतकात केरळमधील मंदिरात नृत्य सादर होत असे. ते श्लोक समजावून सांगण्याच्या पातळीवरचे होते. मुद्रांमधून व बसून सादर होणारे नृत्य असे. मंदिर प्रांगणातील वाद्य संगीताचे व संगीत रत्नाकरमधील साम्यस्थळे त्यांनी सांगितले. पार्वती दत्ता यांनी प्रास्ताविक केले.