मलकापूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व सतरा जागा उच्चांकी मताधिक्याने जिंकून काँग्रेसने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर आज झालेल्या पदाधिकारी निवडीच्या पहिल्या सत्रात नगराध्यक्षपदाचा बहुमान पुनश्च शारदा दिलीप खिलारे यांच्याकडेच राहिला आहे. तर उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी आघाडीचे गटनेते मनोहर शिंदे यांचीच अपेक्षेप्रमाणे वर्णी लागली आहे. निवडीनंतर मनोहर शिंदे यांनी सर्व शासकीय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणारे मलकापूर हे ‘हायटेक सिटी’ साकारण्याची ग्वाही देताना मतदारांनी दिलेला १७-० हा या निवडणुकीतील विजयाचा पॅटर्न काँग्रेससाठी निश्चितच शुभशकुन ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने प्रतिष्ठेच्या नगराध्यक्षपदासाठी विद्यमान नगराध्यक्षा शारदा खिलारे व नवनिर्वाचित नगरसेविका सुनंदा साठे यांची नावे चर्चेत होती. परंतु, नगराध्यक्षपदासाठी खिलारे यांचाच एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांच्या निवडीची आज औपचारिक घोषणा पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी केली. यानंतर लगेचच उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी आघाडीचे सर्वेसर्वा मनोहर भास्करराव शिंदे यांचीच फेरनिवड घोषित झाली. यावर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षांव होत असताना, दुसरीकडे झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने सत्ताधारी गटात उत्साहाचे वातावरण होते.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना शारदा खिलारे यांनी नगराध्यपदासाठी पुन्हा संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून चांगली कामे करू असे आश्वासन दिले. मनोहर शिंदे यांनी सत्तेच सोन करू अशी ठाम ग्वाही देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सततच्या सहकार्यातून झालेल्या विकासावर मलकापूरच्या जनतेने शिक्कामोर्तब केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कृष्णा उद्योगसमूहाचे प्रमुख डॉ. अतुल भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील या स्थानिक नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्याचा आवर्जून उल्लेख करत शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री डॉ. पतंगराव कदम, सतेज पाटील, राजेंद्र मुळक आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांनी जाहीर सभा घेऊन लोकांना काँग्रेसची पटवून दिलेली भूमिका व मलकापूरच्या विकासाबद्दल असलेला दृष्टिकोन मांडून लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास आपण कटिबद्ध असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली. मतदारांनी विकासकामाला स्पष्ट कौल दिला आहे. मताधिक्याची भरघोस टक्केवारी पाहता मलकापूरकरांच्या या टक्केवारीच्या तुलनेत मोठय़ा अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा पूर्ण करण्याची सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.