23 February 2019

News Flash

विशेष महासभेत गदारोळ

नवी मुंबई पालिकेचा गेल्या वर्षांतील आर्थिक लेखाजोखा सादर करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना व भाजपच्या सदस्यांनी पहिल्या सत्रातच तब्बल अडीच

| August 25, 2015 03:24 am

नवी मुंबई पालिकेचा गेल्या वर्षांतील आर्थिक लेखाजोखा सादर करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना व भाजपच्या सदस्यांनी पहिल्या सत्रातच तब्बल अडीच तास गोंधळ घातला. लेखाजोखा सादर करताना त्याच्या प्रती देण्यात याव्यात, पालिकेचे सात वर्षांचे ऑडिट झाले आहे का? अशा प्रश्नावलीत हा गोंधळ वाढत गेला. त्यानंतर दुपारी पालिकेच्या लेखा विभागाने २० वर्षांचा जमा-खर्च मांडला. त्यावेळी काही प्रकल्पांवरील कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी पाहून नवीन आलेल्या नगरसेवकांचे डोळे विस्फारून गेले. उधळपट्टीची राज्य शासनाने चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.राज्यात कधी काळी श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. पालिकेचा पैसा गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेली पंधरा वर्षे पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रात झालेल्या विकासकामांचे श्रेय आणि खर्च यांची जबाबदारी या पक्षावर आहे. पालिकेत जमा होणारा पैसा कुठे गेला, याचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांनी सत्ताधारी पक्षाला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने गेल्या वीस वर्षांतील जमा-खर्च यांचे एक सादरीकरण तयार केले आहे. ते मांडण्यासाठी सोमवारी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. हे सादरीकरण करण्यापूर्वी त्याची सूची देण्यावरून विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी विचारणा केली. सादरीकरणाच्या प्रती प्रशासनाने सदस्यांना न दिल्याने ह्य़ा गदारोळात भर पडली आणि सभागृहाचे कामकाज सुरू होऊ शकले नाही. हा गदारोळ शांत होत नाही तोच पालिकेने मागील सात वर्षांचे ऑडिट केले आहे का, असा सवाल चौगुले यांनी उपस्थित करून नवीन वादाला तोंड फोडले. असे ऑडिट अद्याप तयार नसल्याचे लेखा विभागप्रमुखांनी स्पष्ट केल्याने सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू झाला. अखेर महापौर सुधाकर सोनावणे यांच्या निवेदनानंतर विशेष महासभेचे कामकाज सुरू झाले. प्रशासनाने या सादरीकरणात मालमत्ता, उपकर, नियोजन विभागाकडून आतापर्यंत आलेला एकूण निधी आणि स्थापत्य, पाणी, विद्युत, शिक्षण, आरोग्य या विभागांवर झालेला खर्च नमूद करण्यात आला आहे. यातील अनेक प्रकल्पांवर अवास्तव खर्च केल्याचे दिसून आले.  विरोधकांनी या खर्चाचा लेखाजोखा पालिकेला विचारला आहे. सत्ताधारी पक्षाने दिलेले हे सादरीकरण विरोधकांना एक प्रकारे आयते कोलित हाती लागले आहे.पालिकेच्या इतिहासात प्रथमच वीस वर्षांतील जमा-खर्च यांच्यावर चर्चा करणारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला खर्चाचा आँखो देखा हाल पाहण्यासाठी भाजपच्या बेलापूर येथील आमदार मंदा म्हात्रे पत्रकार कक्षात जातीने उपस्थित होत्या. हवामानाचा अंदाज घेऊन माझ्या हालचाली ठरवीत असल्याचे म्हात्रे यांनी सूचक विधान केले. पालिकेतील या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. विशेष सभा सुरू होण्याअगोदरच विरोधकांनी घातलेला गदारोळ पाहून म्हात्रे यांनी मात्र दुपारी एक वाजता काढता पाय घेतला.

First Published on August 25, 2015 3:24 am

Web Title: sharp in special general assembly
टॅग Ncp