29 September 2020

News Flash

‘शतजन्म शोधिताना’सावरकर प्रेमींसाठी विशेष कार्यक्रम

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विचारांनी एक पिढी भारावली होती. त्यांचे विचार, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आजच्या पिढीसमोर आणण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता

| February 18, 2014 08:10 am

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विचारांनी एक पिढी भारावली होती. त्यांचे विचार, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आजच्या पिढीसमोर आणण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता ‘शतजन्म शोधिताना’ या दृक्श्राव्य स्वरूपातील आविष्काराचे महाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. सावरकरांच्या जन्मभूमीत प्रथमच हा कार्यक्रम होत आहे.
‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गीताने प्रखर देशभक्तीचा प्रत्यय देणाऱ्या सावरकरांचा जीवन प्रवास ५५ कलाकारांचा ताफा उलगडून दाखविणार आहेत. सावरकरांची देशभक्तीपर गीते, स्फूर्तिगीते, भावगीते, पोवाडा, लावणी, फटका, अभिजात साहित्यकृती, दुर्मीळ भाषणे, छायाचित्रे, नाटकातील प्रवेश, नाटय़गीते सादर करण्यात येणार आहेत. सावरकरांच्या साहित्याविषयी आजही अनेकांना फारशी माहिती नाही. त्यांनी शिवाजी महाराजांची आरती लिहिली. बाजीप्रभू, चाफेकर बंधू यांच्यावर पोवाडे लिहिले. लावणी व फटकाही सावरकरांनी लिहिल्याचे अनेकांना ज्ञात नाही. या सर्वाची ओळख कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे. गायक कलाकारांमध्ये वर्षां भावे, नंदेश उमप, गीतिका मांजरेकर, सायली महाडिक, अवंती बारोपीकर, सोमेश नार्वेकर व निमीश कैकडी यांचा समावेश आहे. कलाकारांमध्ये रुपाली देसाई, विजय कदम, श्रीराम केळकर, गौरी पाटील यांचा सहभाग आहे. संगीत संयोजन कमलेश भडकमकर, नृत्य दिग्दर्शन रुपाली देसाई व संगीत दिग्दर्शन वर्षां भावे यांचे आहे. तसेच कार्यक्रमात सावरकर चित्रपटातील दृश्ये व त्यांची काही भाषणेही सादर केली जातील, अशी माहिती मंजिरी मराठे यांनी दिली. कार्यक्रमाच्या माध्यमातून संकलित होणारा निधी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई यांच्या सामाजिक कार्यात वापरला जाणार आहे. अंदमानला भेट देणाऱ्या देशवासीयांना स्वातंत्र्यवीरांचा कोठडीतील काळ कसा होता याची जाणीव करून देण्यासाठी त्या ठिकाणी अंदमान विभाग साकारण्याचा स्वातंत्र्यवीर स्मारक समितीचा मानस आहे. यासाठी सावरकरप्रेमी व दानशूर व्यक्तींनी हातभार लावावा, असे आवाहन आयोजन हेमंत अष्टपुत्रे व अिजक्य उजळंबकर यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 8:10 am

Web Title: shat janma shodhitana
टॅग Nasik 2
Next Stories
1 नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील कामगारांचा महामेळावा
2 येवला रूग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता
3 नाशिककरांवर घरपट्टी व पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार
Just Now!
X