चिमुरडीच्या आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
नऊ दिवसांपासून कधी तरी डोळे उघडून ‘माँ’ म्हणून आवाज देईल, असे वाटत होते मात्र तिने शेवटपर्यंत डोळे उघडले नाहीत आणि तिने सोमवारी रात्री अखेरचा श्वास घेतल्यावर मन सुन्न
झाले.. ज्यांनी हे क्रूर कृत्य केले आहे त्या नराधमांना भर रस्त्यात जिवंत जाळले पाहिजे तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल..अशा संतप्त शब्दात चिमुरडीच्या आई-वडिलांनी भावना व्यक्त करीत अश्रूंना मोकळी वाट करून
दिली.
मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्य़ातील घनसौर या छोटय़ाशा गावात राहणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीवर १७ एप्रिलला काही नराधमांनी अत्याचार केल्यानंतर रस्त्यावर फेकून दिले. तिची प्रकृती खालावल्याने तीन दिवसानंतर मध्य प्रदेश प्रशासनाने तिला नागपूरला हलविण्याचा निर्णय घेतला. गेल्या २० एप्रिलला विमानाने तिला रामदासपेठेतील केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा तिची प्रकृती गंभीर झाली होती.
तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. वेगवेगळ्या तपासणी केल्या मात्र, डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर गेल्या नऊ दिवसांपासून कोमात असलेली चार वर्षीय चिमुरडीने सोमवारी अखेरचा श्वास घेतला आणि नातेवाईकांचा रडण्याचा आक्रोश थांबता थांबेना. आज सकाळी मेडिकलमध्ये उत्तरीय तपासणी झाल्यावर तिचे पार्थिव घेऊन मध्यप्रदेश पोलीस आणि आई-वडील घनसौरकडे रवाना झाले.
यावेळी चिमुरडीच्या आई-वडिलांशी संवाद साधला असता त्यांना काय बोलावे काहीच कळत नव्हते. डोळ्यातील अश्रृ थांबत नव्हते. पोटची पोर गेल्याचे दुख काय असते हे एक आई काय सांगणार? नोव्हेंबरमध्ये ती चार वर्षांची होणार होती. हसत-खेळत असलेली ही चिमुरडी अचानक घरातून बाहेर केव्हा गेली हे समजलेच नाही. दुसऱ्या दिवशी ज्या अवस्थेत सापडली. त्या दिवसापासून मन सुन्न झाले. काहीच करण्याची इच्छा होत नव्हती. परिस्थिती गरिबीची असली तरी मुलींनी खूप शिकावे अशी दोघांचीही इच्छा होती. आज ना उद्या ती डोळे उघडून बघेल आणि ‘माँ म्हणून आवाज देईल असे वाटले होते, तिला काही खाऊ घालावे, मांडीवर घ्यावे असे वाटत होते, मात्र अखेपर्यंत तिने डोळे उघडलेच नाहीत. शरीराची हालचाल बंद झाली होती. डॉक्टर तिला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. ज्यांनी हे कृत्य केले आहे त्या नराधमांना जिवंत जाळले पाहिजे. सरकारने त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.
चिमुरडीचे वडील म्हणाले, चार दिवसांनी बातमी कळल्यावर लगेच नागपूरला आलो त्यावेळी ती कोमात होती. नोकरीसाठी पुण्यापासून चार किमी एका गावात कामाला असल्यामुळे तिची शेवटची भेट एक महिन्यापूर्वी झाली होती. मेहुण्याचे मे महिन्यात लग्न असल्यामुळे गावात जाणार होतो मात्र या घटनेने हातपाय लुळे पडले. तिचा जन्माच्या दिवशी पगार वाढला होता त्यामुळे ती माझ्यासाठी भाग्याची होती.
एकदा तरी तिने डोळे उघडावे असे वाटत होते मात्र, अखेपर्यंत तिने बघितलेसुद्धा नाही. डॉक्टरांबाबत कुठलीच तक्रार नाही. त्यांनी आपल्या परीने सर्व प्रयत्न केले मात्र ती वाचू शकली नाही.
गेल्यावर्षी तिला बालवाडीत टाकले होते. तीन मुली आणि एक मुलगा असून एक मुलगी तर गेली आता बाकी मुलांची काळजी घेण्यासाठी पुण्याला न जाता गावात राहणार असल्याचे वडिलांनी सांगितले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.