माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेल्या मुलीने तिच्या पहिल्या पगारातून चिरनेर परिसरात असलेल्या एका आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ४० शब्दकोश भेट देऊन आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला आहे. मूळ गावापासून हजारो किलोमीटर नोकरीनिमित्ताने वडिलांसोबत आलेल्या स्वागतिका महाराणा हिने आपल्या पहिल्या कमाईतून सामाजिक कार्य करण्याचा हेतू वडिलांकडे स्पष्ट केला. वडिलांना मुलीची ही कल्पना फारच आवडली. त्यांनी उरणमधील सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून चिरनेर परिसरात असलेल्या एका आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना शब्दकोश भेट देण्याचा छोटेखानी कार्यक्रम आखण्यात आला. त्याप्रमाणे या कार्यक्रमात मुलांना ४० शब्दकोश भेट देण्यात आले.
स्वागतिका महाराणा हिने पुस्तकाची भेट देऊन आदिवासी मुलांनीही शिकून मोठे व्हावे व समाज ऋण फेडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आश्रमशाळेत आयोजित केलेल्या शब्दकोश वाटपाच्या छोटेखानी कार्यक्रमात स्वागतिकाचे वडील एस.एन.महाराणा, जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील, फ्रेन्डस ऑफ नेचरचे अध्यक्ष जयवंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते