आज जागतिक ‘वसुंधरा दिन.’ वसुंधरा दिन म्हटले की वृक्ष, लतावेलींनी बहरलेली वने आधी डोळ्यासमोर येतात. पण, केवळ वनराई म्हणजे आयुष्य नव्हे. कारण, विकास हवा तर शहरेही वसायला हवीत. त्यातल्या त्यात इमारती, काँक्रीट, डांबरी रस्त्यांमुळे एकाच एक रंगात रंगलेल्या शहरांना हिरवाईच्या जास्तीत जास्त झालरीने, निळाशार पाण्याने चितारणे आपल्याच हातात आहे. कारण आपली दृष्टीच सुसह्य़ नव्हे तर आपला श्वासही मोकळा करण्याचे काम हे रंग करीत असतात. म्हणूनच शहरात हे रंग चितारण्याचे काम काही निसर्गवेडे करीत आहेत. मोकळ्या जागी झाडे लावण्याचे, गच्चीत शेती फुलविण्याचे प्रयोग हे याच प्रकारातले. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने शहरातील या प्रयोगांची ओळख वाचकांना करून देण्याचा हा प्रयत्न.

जान है तो जहान है.. पण आपल्याला ‘जान’ देणाऱ्या वृक्षवल्लींसाठी आता ‘जहान’ शोधण्याची वेळ डोंबिवलीतील एका सुशिक्षित तरुणीवर आली आहे.
पाणी, फळे, फुले, वनस्पती असं सर्व काही देणाऱ्या निसर्गाचे आपण देणे लागतो, असे मानणाऱ्यांतली आहे ही २५ वर्षांची नमिता भावे. नमिता डोंबिवलीत राहते. ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’मध्ये ‘एचआर एक्झिक्युटिव्ह’ म्हणून जवळपास दीड वर्षे काम करते आहे. परंतु आपला कामधंदा सांभाळण्याबरोबरच निसर्गाचे देणे चुकते करण्याच्या इर्षेने तिला पछाडले आहे. म्हणून कामातून वेळ काढून आपल्या आजूबाजूचा परिसर वृक्षवल्लींनी हिरवागार करण्यासाठी ती धडपडतेय. पदरचे पैसे, वेळ, श्रम खर्च करून तिला फक्त झाडे लावायची आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांची मुळे मातीत घट्ट रुजेपर्यंत तिला त्यांचा आईच्या ममतेने सांभाळही करायचा आहे. अडचण फक्त एकच आहे. कारण मुंबई काय, किंवा शहरीकरणाकडे पूर्णपणे झुकलेले ठाणे किंवा डोंबिवली काय, इथे मॉलच्या दारांमध्ये रबर किंवा प्लॅस्टिकचे ‘कृत्रिम’ वृक्ष उभारायला जागा आहे. पण आपल्याला स्वच्छ हवा, सावली, फळे-फुले देणाऱ्या खऱ्याखुऱ्या वृक्षांना रुजायला जमीन नाही. आपल्या डोंबिवलीत तरी लहान रस्ते, खूप माणसे, वाहने, इमारती यांमुळे झाडांना जागाच उरली नाही, असे नमिताला वाटते. त्यामुळे नमिता हिंडतेय. आजूबाजूच्या सोसायटय़ांमधून, नगरसेवकांच्या घरादारांमधून. ‘कुणी जागा देता का जागा’ म्हणत. पण तिच्या या याचनेला अद्याप यश आलेले नाही.
घराच्या खिडक्यांमध्ये जमेल तेवढी झाडे तिने लावली आहेत. पण तिच्या सोसायटीत जागा नसल्यामुळे झाडे लावता येणे शक्य नाही. त्यातून नारळाच्या झाडांचा वेगळाच त्रास (नारळ पडून गाडय़ांच्या काचा फुटणे, पोचा पडणे वगैरे) सोसायटीवाल्यांना सहन करावा लागत असल्याने तिच्या या उपक्रमात फारसा कुणी उत्साह दाखविला नाही. सोसायटीची जागा झाडांना द्यायची तर गाडय़ा कुठे लावायच्या हा मूलभूत प्रश्न आहेच. त्यामुळे तिला झाडांचा सोस कुंडय़ांवर भागव, म्हणून सुचविण्यात आले आहे.
तिने तेही केले. आपल्या घरच्या ओल्या कचऱ्यातून छोटय़ाछोटय़ा कुंडय़ांमधून खत तयार करून ती ते आपल्या सोसायटीत लावलेल्या कुंडय़ांमधील झाडांकरिता वापरते. तिने फळांच्या बिया जमा करून ठेवल्या आहेत. टेकडय़ांवर जाऊन फळांच्या बिया पेरण्याचे काम करणाऱ्या गटांना ती या बिया देणार आहे. असे लहानमोठे प्रयोग करून ती आपले निसर्गाचे देणे फेडण्याचा प्रयत्न करते.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जमिनीचा ३३टक्के भाग हा वनांनी व्यापला पाहिजे. प्रत्यक्षात केवळ २० टक्के भागात झाडांचे वास्तव्य आहे. इतकेच नव्हे, तर दर वर्षी १ कोटी ३० लाख हेक्टर झाडे कापली जातात आणि त्या जागी इमारतींचे जंगल वसविले जाते, हे तिला पटते आहे. बदललेले ॠतू, अवेळी पडणारा पाऊस, कडाक्याचे ऊन-थंडी या बदलांवर आता आपणच पुढाकार घेऊन विचार करून ‘पेरते व्हायला’ पाहिजे, हे तिने मनोमन पक्के केले आहे. वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण या सगळ्यातून आपण आपल्या देशाची प्रगती करणार आहोतच. पण याबरोबरच आपण निसर्गाची भरभराट करण्यासाठी थोडा वेळ दिला तर? नमिताकडे तो आहे आणि मुख्य म्हणजे निसर्गावर प्रेम आहे. म्हणून ती पत्राद्वारे सर्वाना सांगू इच्छिते.. ज्या लोकांच्या इमारतीभोवती आवार, दुकानासमोर जागा, गच्ची, बाल्कनी मोकळे आहे, त्यांना तेथे झाडे लावायची आहेत, पण वेळेअभावी शक्य झालेले नाही. त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा. नमिताचा ई-मेल आहे.
bhave.namita@gmail.com mailto:bhave.namita@gmail.com