पालकमंत्री मधुकर पिचड व आ. चंद्रशेखर घुले यांनी आश्वासन दिल्यानंतरही शेवगावला नगरपालिका स्थापन झाल्याची प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आम आदमी पार्टी व शेवगाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केला. रविवारी होणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत उपमुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडू व मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत तो मार्गी लावू, असे आश्वासन पिचड यांनी दिले.
‘आप’ व संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आंदोलनामुळे दोन महिलांसह चौघांची प्रकृती बिघडली आहे. परंतु रात्रीपर्यंत त्यांची तपासणी झाली नव्हती. पालकमंत्री पिचड यांच्या उपस्थितीत आज दुपारी नियोजन भवनमध्ये बैठक होती. बैठकीनंतर पिचड व घुले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, शेवगावचे सभापती अरुण लांडे आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शेवगावला नगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवल्याची माहिती दिली. या मागणीची आपण दखल घेतली आहे असे त्यांनी सांगितले.
पिचड व घुले यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. ‘आप’च्या शेवगाव कार्यकारिणीचे नितीन दहिवाळकर यांनी ही माहिती दिली.