हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या सांगली जिल्हय़ातील कडेगावचा मोहरमनिमित्त ताबूत (डोले) भेटीचा कार्यक्रम शुक्रवारी मोठय़ा दिमाखात व तरुणाईच्या जल्लोषात साजरा झाला. १५० वर्षांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जोपासणाऱ्या कडेगावचा मोहरम पाहण्यासाठी सांगली, सातारा जिल्हय़ातील ५० हजारांहून अधिक यात्रेकरू उपस्थित होते.
येथील यात्रेला १५० वर्षांची परंपरा असून ताबुताचा मान हिंदू समाजाकडे आहे.  देशपांडे, पाटील, कळवात व सातभाई हे चार मानाचे ताबूत म्हणून ओळखले जातात. या ताबुतांची उंची १५० फुटांपर्यंत होती. या चार मानाच्या ताबुतांसह बागवान, सुतार, शेटे, शिंदे आदींचे ताबूत या भेटीत सहभागी झाले होते. मोहरमनिमित्त सोंगे काढण्यात आली.
शुक्रवारी दुपारी २.३० वाजता मानाच्या ताबुतांच्या भेटीचा कार्यक्रम पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी पालकमंत्री पतंगराव कदम, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, सोनहिराचे अध्यक्ष मोहनराव कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कडेगावचे सरपंच विजय िशदे यांनी स्वागत केले. या वेळी मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.